मत्स्य तलावाला नियमबाह्य मुदतवाढ

By Admin | Updated: January 9, 2016 02:29 IST2016-01-09T02:29:32+5:302016-01-09T02:29:32+5:30

नाचणगाव ग्रामपंचायत हद्दीतील देव तलाव व सिंगाडे तलाव याचा जाहीर लिलाव न घेताच परस्पर मुदतवाढ देण्यात आली आहे.

Routine Outline of Fishing Tanks | मत्स्य तलावाला नियमबाह्य मुदतवाढ

मत्स्य तलावाला नियमबाह्य मुदतवाढ

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : चौकशी करून कारवाईची मागणी
वर्धा : नाचणगाव ग्रामपंचायत हद्दीतील देव तलाव व सिंगाडे तलाव याचा जाहीर लिलाव न घेताच परस्पर मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे संतप्त झालेल्या मत्स्य पालक व विक्रेत्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन या प्रकरणाची चौकशी करावी, तसेच नाचणगाव येथील सरपंच व ग्रामपंचायत सदस्यावर कलम ३९ अन्वये गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, सप्टेंबर २०१२ मध्ये येथील देव तलाव व सिंगाडे तलावाचा लिलाव करण्यात आले. यानंतर हे दोन्ही तलाव तीन वर्षांसाठी शंकर केवदे यांना देण्यात आले होते. या लिलावाची मुदत ७ सप्टेंबर २०१५ रोजी संपली. त्यामुळे २०१५ मध्ये याचा फेरलिलाव घेणे गरजेचे होते. पण नाचणगाव ग्रामपंचायत कार्यालयाने निविदा सूचना अथवा दवंडी न देता १३ आॅगस्ट २०१५ ला परस्पर ठराव घेतला. तसेच दोन्ही तलावांना बेकायदेशीररित्या तीन वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करणे गरजेचे झाले आहे, असे निवेदनात नमुद आहे.
ग्रामपंचायत कार्यालयाकडे येथील मत्स्य पालक व विक्रेत्यांनी तलावाच्या लिलावाबाबत वारंवार विचारणा केली. मात्र ग्रामपंचायत सचिव व सरपंचाकडून उडवाउडवीचे उत्तरे मिळाली. त्यामुळे या प्रकरणाची माहिती, माहितीच्या अधिकारात मागण्यात आली. याकरिता १४ सप्टेंबर २०१५ ही मुदत देण्यात आली. मात्र मुदत गेल्यावरही ग्रामसेवकांनी या ठरावाची माहिती दिली नाही. यामुळे गटविकास अधिकाऱ्यांकडे माहितीच्या अधिकारात अपिल करण्यात आली. याची माहिती २० नोव्हेंबरला २०१५ ला प्राप्त झाली. यातून जाहीर लिलाव न केल्याची बाब उघड झाली आहे.
नाचणगाव येथील ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्य यांनी १३ आॅगस्ट २०१५ ला तलावाला मुदतवाढ देण्यासाठी ठराव घेतला. यात ग्रामसेवकाने स्पष्टपणे नमुद केले आहे की, ७ सप्टेंबर २०१५ ला लिलावाचा करार संपतो. यात देणे बाकी रक्कम सदर ठेकेदाराकडून वसुल करावी. तसेच फेरलिलाव घेऊन गावात याची दवंडी देण्यात यावी. मागील कंत्राटदाराकडून मुदतवाढ देवू नये. अन्यथा ग्रामपंचायतच्या सर्व समितीवर कलम ३९ अंतर्गत कार्यवाही होवू शकते, अशी वारंवार सूचना केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयाने सदर ठेकेदारास तब्बल तीन वर्षांची मुदतवाढ देताना दीड लाख रुपयाची ठेका आकारणी केली असल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे.
या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, देवळी यांना निवेदनातून दिली आहे. या मागणीची दखल घेत ३ डिसेंबर २०१५ ला विस्तार अधिकारी, देवळी यांनी प्रकरणाची चौकशी केली. तसेच हा चौकशी अहवाल जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना १० डिसेंबर २०१५ यांना सादर करण्यात आला आहे. मात्र यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
माहिती अधिकारात मिळालेल्या दस्तऐवजात सदर ठेकेदाराने मुदतवाढीसाठी केलेला अर्ज प्राप्त झाला आहे. २५ जुलै २०१३ ला तो अर्ज सदर ठेकेदाराने ग्रामपंचायत कार्यालयाकडे केला होता. त्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झाले असून तलावातील मासे वाहून गेले, असे नमुद केले. यावर तहसीलदार देवळी यांच्याकडे या तारखेत पावसाची नोंद मागितली असता १० जुलै २०१३ ला तालुक्यात कुठेही अतिवृष्टीची नोंद नसल्याची बाब पुढे आली आहे. यातून या तलावाच्या लिलावात आणि मुदतवाढ प्रकरणात गैरव्यवहार झाल्याची बाब पुढे येत आहे. आदेश पत्रात कुठेही अतिवृष्टीचा उल्लेख केलेला नाही.
नियमबाह्यरित्या या तलावाला मुदतवाढ दिली असल्याने येथील ग्रामपंचायत कार्यालयाने यात स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केल्याची बाब उघड होत आहे. ३० नोव्हेंबरला २०१५ ला ठराव घेण्यात आला. सरपंच व सदस्यांना वाचविण्यासाठी हा प्रकार केल्याचे दिसून येते. यात ठेक्याची मुदत तीन वर्षावरून एक वर्ष केली आहे. सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या पत्रानुसार ही मुदतवाढ १ वर्षांची केली असे ठरावात नमुद केल्याचे सांगण्यात येते. शासन निर्णय मत्स्य विभाग २०१४/प्रक९/पदुन-१३ च्या परिच्छेद क्र.२३.३ मधील तरतुदी प्रमाणे अतिवृष्टीमुळे तलाव ठेकाधारक यांना एक वर्ष मुदतवाढ मिळण्याची तरतुद आहे. त्यानुसार ही मुदतवाढ दिल्याचे ग्रामपंचायतचे म्हणणे आहे. मात्र हा ठराव देखील मुदतीनंतर घेतला आहे. प्रत्यक्षात तलावाला यापूर्वी मुदतवाढ दिली असून चौकशीची मागणी होत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)

जाहीर लिलाव न करता घेतला ठराव
७ सप्टेंबर २०१५ ला ठेक्याची मुदत संपली. त्यामुळे २०१५ मध्ये याचा फेरलिलाव घेणे गरजेचे होते. पण नाचणगाव ग्रामपंचायतने निविदा सूचना अथवा दवंडी न देता १३ आॅगस्ट २०१५ ला परस्पर ठराव घेतला. तसेच दोन्ही तलावांना बेकायदेशीररित्या तीन वर्षांची मुदतवाढ दिली आहे. नियमबाह्य पद्धतीने या तलावाला मुदतवाढ दिल्याने येथील ग्रामपंचायत कार्यालयाने यात स्वत:चा बचाव करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते

माहिती अधिकारात प्रकार उघडकीस

नाचणगाव येथील सरपंच यांनी सदर ठेकेदारास आदेश पत्र दिले आहे त्यावर जावक क्रमांक नमुद केलेला नाही. त्यामध्ये नमुद केले आहे की, ग्रा.पं. नाचणगावचे मालकीचे दोन तलावाचे मासेमारी हक्क दि. ८ सप्टेंबर २०१५ ते ७ सप्टेंबर २०१८ या कालावधीकरिता मागील लिलावाच्या शर्ती व अटींच्या अधिन राहून शंकर केवदे यांना दिले आहे. याकरिता ३ वर्षाकरिता दीड लाख रूपये असा ठेका वाढवून दिल्याची बाब अधिकारात उघड झाली आहे.

Web Title: Routine Outline of Fishing Tanks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.