रोहण्याचा कापूस चालला आर्वीत
By Admin | Updated: November 28, 2015 03:08 IST2015-11-28T03:08:49+5:302015-11-28T03:08:49+5:30
कापसाला आधीच शासनाने न परवडणारा भाव दिला आहे. असे असतानाही रोहणा येथे खासगी व्यापाऱ्यांकडून आर्वीच्या तुलनेत पन्नास ते शंभर रूपये कमी भाव मिळत आहे.

रोहण्याचा कापूस चालला आर्वीत
भावात तफावत : संकलन केंद्रावर आवक मंदावली
रोहणा : कापसाला आधीच शासनाने न परवडणारा भाव दिला आहे. असे असतानाही रोहणा येथे खासगी व्यापाऱ्यांकडून आर्वीच्या तुलनेत पन्नास ते शंभर रूपये कमी भाव मिळत आहे. त्यामुळे रोहणा परिसरातील कापूस आर्वी बाजारात विक्रीस जात आहे. परिणामी रोहणा संकलन केंद्रावर कापसाची आवक मंदावली आहे.
रोहणा येथे अद्यावत यंत्र सामुग्री असलेला, पाण्याची व विजेची पर्याप्त व्यवस्था असलेला जीन आहे. कापसाची साठवणूक करण्यासाठी भरपूर सिमेंट ओटे तथा भव्य परिसर आहे. दरवर्षी या जीनमध्ये मोठ्या प्रमाणात कापूस गोळा होतो. यंदा रोहणा येथील खासगी व्यापारी कापूस खरेदी करताना आर्वी येथील भावाच्या तुलनेत पन्नास ते शंभर रूपये प्रतिक्विंटल दर कमी देत आहे. शेतकऱ्याने किंवा खेडा व्यापाऱ्याने आपला कापूस आर्वी बाजारात नेल्यास त्याला प्रतिक्विंटल पन्नास ते शंभर रूपये वाहतूक खर्च जास्त लागतो. म्हणून आमचा भाव आर्वी पेक्षा कमी असतो असे रोहणा येथील व्यापारी सांगतात.
वास्तविक पाहता रोहणा येथील जीनमध्ये जिनिंग व प्रेसिंगची व्यवस्था आहे. गाठी ठेवण्यासाठी एनसीडीसीचे मोठे गोदामही आहे. व्यापाऱ्यांच्या गाठी मोठे व्यापारी जागेवरून उचलतात. रोहणा परिसरात काळी कसदार जमीन असून या परिसरातील कापूस उत्तम प्रतीचा व लांब धाग्याचा असतो. कापसाच्या पाकळीत कमी सरकी व अधिक रूईसाठी प्रसिद्ध असलेल्या विविध वाणांचा येथे अधिक पेरा असतो. तसेच बंडीने कापूस बाजारात नेण्याची पद्धत कालबाह्य झाली आहे. सधन शेतकरी व खेडा व्यापारी कापूस वाहतुकीसाठी मालवाहक गाड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. अशावेळी आर्वी बाजारात कापूस नेण्यासाठी खूप मोठा वाहतूक खर्च येत नाही. परिणामी जास्त दर मिळत असल्याने रोहणा परिसरातील कापूस आर्वी येथे विक्रीस जात आहे. ही वाहतूक टाळण्यासाठी रोहणा परिसरातील शेतकऱ्यांना आर्वीचाच भाव मिळावा अशी स्थानिक कापूस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे.
भावातील ही तफावत यापुढेही अशीच सुरू राहिल्यास रोहणा परिसरातील उच्च प्रतीचा हजारो क्विंटल कापूस आर्वी बाजारात जाईल व स्थानिक जीनमध्ये अत्यल्प आवक होईल. त्यामुळे रोहणा येथील जीन प्रशासनाने खासगी व्यापाऱ्यांना आर्वीच्या भावातच रोहणा येथे कापूस खरेदीच्या सूचना कराव्या अशी मागणी रोहणा परिसरातील कापूस उत्पादक शेतकरी करीत आहे.(वार्ताहर)