महाबीजच्या नावावर बाजारात लूट

By Admin | Updated: June 10, 2016 02:04 IST2016-06-10T02:04:04+5:302016-06-10T02:04:04+5:30

खरीप हंगाम तोंडावर आला आहे. जिल्ह्यात पावसाचे आगमणही झाले आहे. यामुळे बळीराजा बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे.

Robbery in the name of Mahabeej | महाबीजच्या नावावर बाजारात लूट

महाबीजच्या नावावर बाजारात लूट

बळीराजावर आघात : सोयाबीन ४०० तर तुरीच्या बियाण्यांकरिता २०० रुपयांची जादा मागणी
वर्धा : खरीप हंगाम तोंडावर आला आहे. जिल्ह्यात पावसाचे आगमणही झाले आहे. यामुळे बळीराजा बियाण्यांची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहे. यात शेतकरी महाबिजच्या बियाण्यांची मागणी करण्याकरिता गेले असता बाजारात त्यांना जादा पैशाची मागणी करण्यात येत असल्याची ओरड आहे. महाबीजच्यावतीने बियाण्यांची दरवाढ केल्याचे त्यांना सांगितले जात आहे. मात्र महाबिजकडून कुठलीही दरवाढ झाली नसल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. शेतकरी हंगामाच्या तयारीत असताना जिल्ह्यात त्याची लूट होत असल्याचे दिसून आले आहे.
महाबीज कंपनीच्या बियाण्यांच्या नावावर होत असलेल्या लुटीचे बळी जिल्ह्यातील शेतकरी ठरत आहेत. यामुळे या प्रकरणाची चौकशी महाबिजच्यावतीने किंवा कृषी विभागाच्यावतीने करून जिल्ह्यातील अशा व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आहे. दुष्काळाच्या छायेत असलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची होत असलेली परवड थांबविण्याकरिता शासनाने प्रयत्न करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
कृषी विभागाच्यावतीने जिल्ह्यात यंदाच्या खरीपात सुमारे ४ लाख हेक्टरवर पेऱ्याचे नियोजन केले आहे. यात सोयाबीन व तुरीचा पेरा वाढणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. त्यांचे नियोजन आजच्या स्थितीत जिल्ह्यात खरे ठरत आहे. बाजारात शेतकरी सोयाबीन व तुरीचे बियाणे खरेदी करण्याकरिता जात आहेत. त्यांच्याकडून कृषी केंद्र संचालकाला महाबिजचे सोयाबीन किंवा तुरीची मागणी करण्यात आल्यास त्यांना महाबिजने बियाण्यांचे दर वाढविल्याचे सांगण्यात येते. त्यांच्याकडून सोयाबीनच्या विविध वाणाच्या एका ३० किलो बॅगच्या मागे सरासरी ४०० रुपये जादा घेण्यात येत आहे. तर तुरीच्या दोन किलोच्या बॅगच्यामागे सरासरी २०० रुपये जादा घेण्यात येत असल्याची ओरड शेतकऱ्यांकडून होत आहे.
ही वाढ केवळ तूर व सोयाबीनच्या बियाण्यांवरच नाही तर मुंग उडद व इतर बियाण्यांवर असल्याचीही ओरड आहे. ऐन हंगामाच्या तोंडावर झालेली बियाण्यांची दरवाढ व त्यात मदत म्हणून वाढलेले खतांचे दर यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. याचा विचार शासनाने करून यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)

अनेक कृषी केंद्रसंचालकांकडे महाबिजच्या बियाण्यांचा जुना स्टॉक आहे. मात्र त्यांच्याकडून तो विकण्याकरिता टाळाटाळ करण्यात येत आहे. महाबिजच्या बियाण्यांची मागणी वाढल्यास त्याचा काळा बाजार करण्याची त्याची तयारी असावी अशी चर्चा बाजारात आहे.
महाबिजचे बियाणे महागल्याचे सांगत अनेकांकडून दुसऱ्या कंपनीचे बियाणे विकण्याचा सपाटा सुरू झाला आहे. यात अव्वाच्या सव्वा दर लावून ऐन हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची लूट सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात आहे. याकडे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देत कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

महाबीजच्यावतीने बियाण्यांची कोणतीही दरवाढ करण्यात आली नाही. शेतकऱ्यांना देण्यात येणारे बियाणे अनुदानावरील आहे. शिवाय जिल्ह्यात मागणीनुसार पुरवठा झाला आहे. यात कोणी काळाबाजार करीत असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल.
- एन.पी. खांडेकर, जिल्हा व्यवस्थापक, महाबिज

Web Title: Robbery in the name of Mahabeej

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.