आगरगावात रखडले आठ महिन्यांपासून रस्त्याचे काम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST2019-10-30T05:00:00+5:302019-10-30T05:00:55+5:30
भूजमपूजनानंतर रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. आठ महिन्यांच्या कालावधीत ठेकेदाराने पंचवीस टक्केही रस्त्याचे काम केले नाही. केवळ मुरुम आणि चुरी अंथरण्याचे काम झाले असून तेही अर्धवट अवस्थेत आहे. कंत्राटदाराचा मनमर्जी कारभार सुरू आहे. असे असताना जि. प. बांधकाम विभागाचे अधिकारीही मौन बाळगून आहेत. अडचणी सहन कराव्या लागत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

आगरगावात रखडले आठ महिन्यांपासून रस्त्याचे काम
लोकमत न्यूज नेटवर्क
आगरगाव : येथे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागांतर्गत १० लाख रुपयांच्या रस्ता बांधकामाचे फेब्रुवारीमध्ये भूमिपूजन झाले. आठ महिन्याचा कालावधी लोटूनही अद्याप या रस्त्याचे काम पंचवीस टक्केही पूर्ण झालेले नाही. यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे कंत्राटदारासह जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
भूजमपूजनानंतर रस्त्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. आठ महिन्यांच्या कालावधीत ठेकेदाराने पंचवीस टक्केही रस्त्याचे काम केले नाही. केवळ मुरुम आणि चुरी अंथरण्याचे काम झाले असून तेही अर्धवट अवस्थेत आहे. कंत्राटदाराचा मनमर्जी कारभार सुरू आहे. असे असताना जि. प. बांधकाम विभागाचे अधिकारीही मौन बाळगून आहेत. अडचणी सहन कराव्या लागत असल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.
आगरगाव बस थांबा ते बाजार चौक या डांबरीकरण रस्त्याचे काम गेल्या आठ महिन्यांपासून बंद आहे. परिणामी, ग्रामस्थांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्ता बांधकामाचा दर्जा सुमार असल्याचीही ओरड होत आहे. रस्त्यावर केवळ मुरूम आणि चुरी अंथरल्यामुळे वाहने घसरून दररोज अपघात होत आहेत. मात्र, कंत्राटदार आणि बांधकाम विभागाला सोयरसुतक नाही.
पावसामुळे रस्त्यांची लागली वाट
आष्टी (शहीद) : अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची अक्षरश: चाळणी झाली आहे. तळेगाव- आष्टी- साहूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम संथगतीने सुरू आहे. यामुळे अपघात होत आहेत. हीच परिस्थिती इतरही रस्त्यांची झाली आहे. तळेगाववरून आष्टीला येण्यासाठी हाच मुख्य मार्ग आहे. या मार्गावर मुरूम टाकण्यात आला. २५ टक्के सिमेंट काँक्रिटचे काम झाले आहे. मात्र, कामाची गती मंद आहे. आष्टी-मोर्शी, आष्टी-थार, पार्डी, टेकोडा, गोदावरी, देलवाडी, अंबिकापूर या रस्त्यांचीही वाईट अवस्था झाली आहे. गावातील अंतर्गत रस्तेही दुर्दशित आहेत. शासनाच्या सोयीसुविधा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी रस्त्यांची समस्या मार्गी लावणे गरजेचे आहे. तालुक्यात आष्टी-किन्हाळा, गोदावरी या रस्त्याने जाताना नरकयातना सहन कराव्या लागत आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून कामे मंजूर झाली; अद्याप सुरू झाली नाही. परिणामी नागरिकांना माती तुडवत ४ कि़मी. जावे लागत आहे. खडकी खंबीत-बेलोरा या रस्त्यासाठी वर्षभरापासून निधी आला आहे. मात्र, कंत्राटदार कामच करीत नसल्याने नागरिकांत रोष आहे.