दोन कोटींच्या प्रतीक्षेत रस्त्याची झाली लक्तरे
By Admin | Updated: August 24, 2015 02:07 IST2015-08-24T02:07:36+5:302015-08-24T02:07:36+5:30
स्थानिक बसस्थानक ते बौद्ध पुलापर्यंतच्या रस्ता दुरूस्ती व सौंदर्यीकरणासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत; ...

दोन कोटींच्या प्रतीक्षेत रस्त्याची झाली लक्तरे
अल्लीपूर : स्थानिक बसस्थानक ते बौद्ध पुलापर्यंतच्या रस्ता दुरूस्ती व सौंदर्यीकरणासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाले आहेत; पण अद्यापही काम सुरू झाले नाही. या निधीच्या प्रतीक्षेत रस्त्याची मात्र लक्तरे झाली आहेत. सर्वत्र खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने वाहतूक धोक्याची झाली आहे. याकडे लक्ष देत रस्त्याचे काम त्वरित सुरू करावे, अशी मागणी होत आहे.
बसस्थानक ते बौद्ध पुलापर्यंत एक किमी रस्त्यासाठी एक कोटी ९९ लाख रुपये मंजूर झाले आहेत. यात रस्ता दुरूस्ती, सौंदर्यीकरण, दोन नाल्या पथदिवे, रस्ता दुभाजक आदी कामे करावयाची आहेत; पण अद्याप काम सुरू झाले नाही. गावात ये-जा करण्यासाठी सर्व रस्ते याच मार्गाला मिळतात. गावाची सर्व मुख्य वाहतूक याच मार्गाने होते. याच रस्त्याची बसस्थानकापासून दोन फुटापर्यंत खोल खड्ड्यानेच सुरूवात होते. गळोबा मैदान, प्राथमिक आरोग्य केंद्र, दोन विद्यालये याच मार्गावर आहेत. बौद्ध पुलाच्या शेवटच्या टोकापर्यंत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. यापूर्वी खड्डे बुजविण्यात आले होते; पण पुन्हा रस्ता जैसे थे झाला आहे. दैनंदिन वाहतुकीमुळे खड्ड्यांमध्ये भर पडत असून गिट्टी उघडी पडली आहे. एक किती रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत होणार आहे. देवळी येथील कंत्राटदाराने निविदा घेतली आहे; पण प्रत्यक्ष कामास सुरूवात कधी होणार, हा प्रश्नच आहे. बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देत त्वरित काम सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)