कारला गावात येणारा रस्ता केला बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 05:00 IST2020-05-13T05:00:00+5:302020-05-13T05:00:01+5:30
लॉकडाऊन असल्याने नागरिक घरीच स्तब्ध झाले आहे. एकीकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे गावठी दारूचा महापूर यामुळे कारला गावातील नागरिक दहशतीच्या सावटाखाली होते. कारला गावातील सावजीनगर परिसरात गावठी दारूविक्री राजरोसपणे सुरू होती. याबाबत अनेकदा पोलिसांना माहिती दिली. पण, पोलिसांकडून कुठलीही कारवाई दारूविक्रेत्यांवर करण्यात आली नाही.

कारला गावात येणारा रस्ता केला बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : नजीकच्या कारला गावातील सावजी नगर परिसरात गावठी दारूची सर्रास विक्री होत होती. हिवरा (तांडा) येथे दारूविक्रेत्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली. याचे पडसाद कारला गावात उमटले असून महिलांनी कारला गावात येणारा मुख्य रस्ता बंद केला.
लॉकडाऊन असल्याने नागरिक घरीच स्तब्ध झाले आहे. एकीकडे कोरोनाची भीती आणि दुसरीकडे गावठी दारूचा महापूर यामुळे कारला गावातील नागरिक दहशतीच्या सावटाखाली होते. कारला गावातील सावजीनगर परिसरात गावठी दारूविक्री राजरोसपणे सुरू होती. याबाबत अनेकदा पोलिसांना माहिती दिली. पण, पोलिसांकडून कुठलीही कारवाई दारूविक्रेत्यांवर करण्यात आली नाही.
नुकताच हिवरा (तांडा) येथे एका मृत महिलेचा कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्ट आल्याने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. इतकेच नव्हेतर ती महिला गावठी दारूविक्री करणारी असल्याचे समजताच गावातील नागरिकांची भंबेरीच उडाली. गावातही मोठ्याप्रमाणात गावठी दारुविक्री सुरू असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाच्या दहशतीचे सावट पसरले आहे. त्यामुळे कारला गावातील सावजीनगर परिसरातील महिलांनी दारूविक्रीवर आळा बसण्यासाठी गावातील मुख्य मार्गच बंद केला असून बाहेरून येणाऱ्यांना चांगलाच धडा शिकविल्या जात आहे.
दोन दिवसांपूर्वी झाली होती हत्या
दोन दिवसांपूर्वीच पैशाच्या वादातून दारूविक्रेता राहुल किसना मगर याची हत्या करण्यात आली होती. कारला येथे काही दारूविक्रेते राजरोसपणे दारूची विक्री करीत असून पोलिसांनी याकडे लक्ष देत दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
शहरात अफवांना फुटले पेव
हिवरा (तांडा) येथील मृत महिलेचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने संपूर्ण प्रशासन खडाडून जागे झाले. याचे पडसाद शहरातही उमटले. दिवसभर शहरात वेगवेगळ्या अफवांना पेव फूटले होते. जिल्ह्यात कोरोनाचा रुग्ण आढळल्याची महिती होताच शहरातील इंदिरानगर, गांधीनगर परिसरातील नागरिकांनी स्वत:हूनच फलक लावून रस्ते दोर बांधून रस्ते बंद केले. परंतु, शहरात या परिसरात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने परिसर बंद केल्याची अफवा शहरात वाऱ्यासारखी पसरली. या अनुषंगाने का होईना शहरातील नागरिकांनी कोरोना आजाराचे गांभीर्य ओळखले असल्याचे एकंदरीत चित्र शहरात पहावयास मिळत आहे.