वर्धा-नागपूर मार्गावरील रस्ता दुभाजक क्षतिग्रस्त
By Admin | Updated: February 21, 2017 01:16 IST2017-02-21T01:16:15+5:302017-02-21T01:16:15+5:30
वर्धा-नागपूर मार्गावरील उडाणपूलालगतच्या दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. याला आठ-दहा वर्षांचा कालावधी झाला आहे.

वर्धा-नागपूर मार्गावरील रस्ता दुभाजक क्षतिग्रस्त
अपघाताच्या घटनांत वाढ : दुभाजकांची दुरुस्ती गरजेची
सेलू : वर्धा-नागपूर मार्गावरील उडाणपूलालगतच्या दुभाजकांची दुरवस्था झाली आहे. याला आठ-दहा वर्षांचा कालावधी झाला आहे. मात्र या तुटलेल्या दुभाजकांची दुरुस्ती करण्यात आली नाही. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
अत्यंत वर्दळीच्या या मार्गावर मुख्यमार्गाला जोडूनच सेलू शहरात येण्यासाठी तयार केलेल्या रस्त्याच्या मधोमध दुभाजक लावण्यात आले आहे. वाहतूक सुरळीत करण्यासाठी लावलेले दुभाजक क्षतिग्रस्त झाल्याने येथे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा वाहन चालक या तुटलेल्या दुभाजकाजवळून सर्रास वाहने काढतात. अशात समोरुन वाहन येत असल्यास अपघात होतो. उडाणपूलाच्या दोन्ही बाजुला उतार असल्याने वाहने वेगाने खाली येतात. त्यामुळे वाहने अनियंत्रित होऊन येथे अपघात होतो. त्यामुळे येथील क्षतीग्रस्त दुभाजकाची दुरुस्ती करणे गरजेचे ठरत असून लक्ष देण्याची मागणी आहे.(तालुका प्रतिनिधी)
वाहतुकीचा होतो पचका
रस्ता दुभाजक तुटलेले असल्याने वाहन चालक येथून वाहने मुख्य मार्गावर काढतात. अशात पुलावरुन खाली येत असलेल्या वाहनांची धडक लागण्याचा धोका असतो. येथील दुभाजक वाहनांच्या धडक लागुनच क्षतीग्रस्त झाले आहे.
गत सात-आठ वर्षात दुभाजकांची डागडुजी केली नाही. मुख्य मार्गावरील वाहनांची संख्या पाहता येथील दुभाजक दुरुस्त करणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे वाहतूक अधिक सुरक्षीत होण्यास मदत होईल.