रेती वाहतुकीने लागली रस्त्यांची वाट
By Admin | Updated: December 23, 2014 23:09 IST2014-12-23T23:09:20+5:302014-12-23T23:09:20+5:30
तालुक्यात एकूण १० रेतीघाट आहेत़ यातून शासनाला दरवर्षी ८ ते १० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो़ या महसुलातून रस्त्यांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी निधी राखीव ठेवला जातो;

रेती वाहतुकीने लागली रस्त्यांची वाट
आष्टी (शहीद) : तालुक्यात एकूण १० रेतीघाट आहेत़ यातून शासनाला दरवर्षी ८ ते १० कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होतो़ या महसुलातून रस्त्यांच्या देखभाल व दुरूस्तीसाठी निधी राखीव ठेवला जातो; पण गत पाच वर्षांपासून गौणखनिज विभागाने तालुक्यातील प्रमुख रस्त्यांच्या मजबुती व डांबरीकरण कामासाठी छदामही दिला नाही़ यामुळे रेती वाहतुकीमुळे दुरवस्था झालेले रस्ते जैसे थे खितपत आहे़
तालुक्यातील रेतीघाट असलेले सर्व गावे रस्त्यांच्या समस्येने त्रस्त झाले आहेत़ नागरिकांना जीवघेणे रस्ते दररोज मनस्ताप देत आहेत़ रेतीघाटातून दिवस-रात्र क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहतूक सुरू असते़ यामुळे काळ्या मातीत असणारे रस्ते पूर्णत: दबले आहेत़ रेतीमाफियांनी रस्त्याच्या वाहिन्याच बंद करून नागरिकांवर अन्याय केला आहे़ शिरसोली गावातील सर्व नागरिकांनी गतवर्षी रेतीघाट लिलावावर बंदी घातली होती़ सदर बंदी यंदाही कायम ठेवली आहे़ गोदावरी रस्ता २ किमी लांबीचा आहे़ या रस्त्यावर सर्वाधिक रेतीची वाहतूक होते़ रस्ता शेतातून गेल्याने व काळी माती असल्याने तो दबला आहे़ साधी बैलबंडीही या रस्त्यावरून चालविता येत नाही़ २००५-०६ मध्ये संपूर्ण ग्रामीण योजनेतून थोडेफार काम झाले़ नंतर शासनाकडून निधीच आला नाही़
टेकोडा रस्ता एक किमी लांब आहे़ रस्त्यावरील डांबरीकरण मातीत दबले आहे़ रस्त्याला लागून काही अंतरावर कालवा आहे़ या कालव्याचे पाणी दोन्ही बाजुला पाझरत असल्याने शेतांचीही वाट लागली आहे़ भिष्णूर रस्त्यावर भिष्णूर व ईस्माइलपूर रेतीघाट आहे़ या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत़ यामुळे वाहनेही व्यवस्थित चालविता येत नाही़ रात्री पायी चालताना खोल खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघातात वाढ झाली आहे़ शासनाने गौणखनिज प्राप्त झालेल्या गावांना निधी देण्याची घोषणा केली होती़ यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्तावही पाठविण्यात आले होते; पण गौणखनिज अधिकारी व नियोजन विकास अधिकाऱ्यांकडे सदर प्रस्ताव धूळखात आहे़ गरज नसताना भलत्याच ठिकाणी गौणखनिजाचा निधी खर्च होत असल्याचे दिसते़ यामुळे गावकऱ्यांनीच आवाज उठविला असून रस्त्याच्या दुरूस्तीचा निधी न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे़(प्रतिनिधी)