भोसा ते सिंदी (रे.) रस्त्याचे डांबरीकरण करा
By Admin | Updated: August 10, 2016 00:43 IST2016-08-10T00:43:34+5:302016-08-10T00:43:34+5:30
भोसा ते सिंदी (रेल्वे) रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असून डबके साचले आहे.

भोसा ते सिंदी (रे.) रस्त्याचे डांबरीकरण करा
चार गावांतील ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची मागणी : मुलांनी लावली रस्त्यावरील खड्ड्यांत बेशरमची झाडे
वर्धा : भोसा ते सिंदी (रेल्वे) रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य असून डबके साचले आहे. परिणामी, भोसा, उमरा, वायगाव, पारडी, नंदपूर येथील नागरिक, विद्यार्थ्यांना मरणयातना सहन कराव्या लागत आहे. रस्ता दुरूस्त होत नसल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी शनिवारी खड्ड्यांमध्ये बेशरमची झाडे लावत आंदोलन केले. सदर रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना निवेदनही देण्यात आले.
भोसा ते सिंदी (रेल्वे) हे अंतर चार किमी आहे. सिंदी येथे नगर विद्यालय, नेहरू विद्यालय, रेल्वे स्टेशन, तहसील कार्यालय, पोलीस ठाणे आणि कॉन्व्हेंट तसेच प्राथमिक शाळा व बाजारपेठ आहे. यामुळे भोसा, उमरा, वायगाव, पारडी, नंदपूर येथील विद्यार्थी व नागरिकांना सिंदी (रेल्वे) येथे ये-जा करावी लागते; पण रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने चिमुकले विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. दीड महिन्यापूर्वी या रस्त्याने दुचाकीने जात असताना मागे बसलेली महिला खड्ड्यामुळे पडली. तिला सेवाग्राम रुग्णालयात नेत असता वाटेतच तिचा मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी भोसा येथील हरिभाऊ पाटील हे त्यांच्या पत्नीला रुग्णालयात घेऊन जात होते. वाहन खड्ड्यात गेल्याने नियंत्रण सुटून अपघात झाला. यात मुलगा व पत्नी जखमी झाले. उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी वर्धा, नागपूर येथे जातात. वाहनांत बिघाड येत असल्याने परत यावे लागते.
गुरुवारी सिंदी (रेल्वे) येथील बाजार राहत असल्याने भोसा, उमरा, वायगाव, पारडी, नंदपूर या गावांसाठी आॅटो असतात; पण त्यात कुणी बसत नाही. खड्डेमय रस्त्यामुळे अपघात झाल्यास जीव जाईल, ही भीती असते. रोजगाराच्या शोधात अनेकांना बुटीबोरी येथे जावे लागते; पण ते वेळेत पाहोचू शकत नाही. परिणामी, त्यांना कामही मिळत नाही. मग, त्यांनी उधरनिर्वाह कसा करावा व मुलांच्या शिक्षणाचे काय, हा प्रश्नच आहे. या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी निवेदने दिली; पण कार्यवाही झाली नाही. परिणामी, ग्रामस्थांत असंतोष पसरला आहे. शनिवारी विद्यार्थ्यांनी भोसा ते सिंदी रस्त्यावरील खड्ड्यांत बेशरमची झाडे लावली. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दुरूस्तीची मागणी केली. यावेळी प्रवीण अंड्रस्कर, संजय दांडेकर, अमित गाटे, महेश अवचट, सतीश दांडेकर, बंटी चौधरी, दिनेश जाधव, आशिष अंड्रस्कर, प्रमोद ठोंबरे, मनोज नरड, अमोल निमसडे, श्रीकांत, स्वप्नील, प्रफुल इंगळे, कुणाल गोस्वामी, तुषार राऊत, रोशन निमसडे, मंगेश मिस्कीन यासह विद्यार्थी उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)
शाळा, महाविद्यालयात जायचे कसे ?
भोसा, उमरा, वायगाव, पारडी, नंदपूर या गावांतील नागरिक आपल्या मुलांना शिकविण्यास तयार आहेत. विद्यार्थीही सिंदी रेल्वे, वर्धा, नागपूर येथे शिक्षणासाठी जातात; पण रस्त्याची अत्यंत दुरवस्था असल्याने त्यांना अपघातांना सामोरे जावे लागते. परिणामी, शैक्षणिक नुकसानास सामोरे जावे लागते. या गावांना रस्ताच नसल्याने आम्ही शाळा, महाविद्यलयांत जायचे कसे, असा सवाल विद्यार्थ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
दैनंदिन व्यवहारांवरही गंडांतर
भोसा ते सिंदी (रेल्वे) या रस्त्यानेच परिसरातील ग्रामस्थांना सिंदी रेल्वे गाठावे लागते. रस्त्यावर खड्ड्यांशिवाय काहीच नसल्याने प्रवास करायचा कसा, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या भागातील ग्रामस्थांचे सर्व व्यवहार सिंदीशी जुळलेले आहेत. कुठल्याही कामासाठी सिंदीला जावे लागते. रस्त्याची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांच्या दैनंदिन व्यवहारांवरही गंडांतर येत असल्याचे दिसते. याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.