रस्ता सौंदर्यीकरणाची लागली वाट
By Admin | Updated: February 28, 2016 02:15 IST2016-02-28T02:15:15+5:302016-02-28T02:15:15+5:30
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कारंजा (घा.) टोल कंपनी अंतर्गत रस्ता सौंदर्यीकरणाची वाट लागली आहे.

रस्ता सौंदर्यीकरणाची लागली वाट
झाडे मृतावस्थेत : ओरिएंटल टोल नाका वसुलीपुरताच
तळेगाव (श्या.पं.) : नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील कारंजा (घा.) टोल कंपनी अंतर्गत रस्ता सौंदर्यीकरणाची वाट लागली आहे. अनेक महिन्यांपासून पाणी न दिल्याने झाडे मृतावस्थेत आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी आहे.
तळेगाव ते कोंढाळी या ५० किमी रस्ता व सौंदर्यीकरणाची देखरेख ओरिएंटल टोल कंपनीकडे आहे. महामार्गाची देखभाल, सौंदर्यीकरण व गुळगुळीत रस्त्याची जबाबदारी कारंजा घाडगे ओरिएंटल नाक्याची आहे; पण या ५० किमी अंतरातील रस्त्यावरील झाडे मृतावस्थेत आहे. दररोज ७ ते ८ लाखांवर २४ तास वसुली करणारा टोल नाका केवळ वसुलीपुरताच मर्यादित असल्याचे चित्र आहे. रात्री तळेगाव येथील हायमास्ट लाईट बंद असतात. यामुळे महामार्गावर तसेच तळेगाव चौकात काळोखाचे साम्राज्य असते. वाहन चालकांना वाहतूक कर आकारणारा ओरिएंटल नाका सुविधा देण्यास असमर्थ ठरत आहे.
अर्धवट रस्ता सौंदर्यीकरणात घाण साचल्याने महामार्गाने ये-जा करणारे लोकप्रतिनिधीही आश्चर्यच व्यक्त करताना दिसतात. टोल भरूनही योग्य सुविधा दिल्या जात नसतील तर टोल भरायचा कशाला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चार-पाच किमी ट्रकबाय बनविला आहे. तेथे ट्रक चालकांकरिता शौचालय व आंघोळीची व्यवस्था नाही. यामुळे कारंजा टोल नाक्याबाबत ट्रक चालकांमध्ये असंतोष पसरला आहे. शिवाय महिलांकरिता स्वच्छतागृह नाही. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.(वार्ताहर)