भारनियमनामुळे पिके धोक्यात; शेतकरी चिंतेत
By Admin | Updated: October 29, 2014 22:54 IST2014-10-29T22:54:34+5:302014-10-29T22:54:34+5:30
यंदा निसर्गाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागत आहे़ आता पिके बहरली असल्याने पाणी गरजेचे आहे; पण भारनियमन केले जात असल्याने ओलित करणेही कठीण झाले आहे़

भारनियमनामुळे पिके धोक्यात; शेतकरी चिंतेत
वायगाव (नि़) : यंदा निसर्गाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागत आहे़ आता पिके बहरली असल्याने पाणी गरजेचे आहे; पण भारनियमन केले जात असल्याने ओलित करणेही कठीण झाले आहे़ महावितरणने याकडे लक्ष देत भारनियमन कमी करावे, अशी मागणी होत आहे़
सध्या कपाशीचे पीक चांगले बहरले आहे; पण पाणी नसल्याने कुरपत असल्याचे दिसते़ विहीर व पंप असलेले शेतकरी कपाशी तरी हाती यावी म्हणून ओलित करीत आहेत; पण महावितरणच्या भारनियमनाने शेतकऱ्यांची चांगलीच कसरत होत आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा वीज पुरवठा खंडित होतो़ यामुळे शेतकऱ्यांना रात्रीही शेतात ओलित करावे लागत आहे़ रात्री भारनियमन केले जात असल्याने तेही शक्य होताना दिसत नाही़ यामुळे रात्र थोडी सोंगे फार प्रमाणे शेतकऱ्यांना रात्रभर शेतात येरझारा माराव्या लागत असल्याचे चित्र आहे़ वीज पुरवठा सुरू झाला की पुन्हा शेतात जाऊन पंप सुरू करणे, ओलित करणे आणि मधेच वीज खंडित झाली तर पुन्हा घरी परतणे, असा नित्यक्रम परिसरातील शेतकऱ्यांचा सुरू आहे़ रात्री शेतात ये-जा करावी लागत असल्याने वन्य प्राण्यांचा धोकाही निर्माण झाला आहे़ असे असले तरी पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन शेतात जावेच लागत आहे़ याबाबत शेतकऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करून रात्री भारनियमन करावे, अशी विनंती केली; पण उपयोग झाला नाही़ यामुळे शेतकऱ्यांत असंतोष पसरला आहे़ महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़(वार्ताहर)