जिल्ह्यात क्वॉरंनटाईन वाढतीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 05:00 IST2020-05-05T05:00:00+5:302020-05-05T05:00:32+5:30
आष्टी तालुक्यातील जामनगर येथील तीघेजन नागपूर येथील मनीष नगरमध्ये काही कारणास्तव थांबले होते. ते मुळ गावी आष्टी येथे परत आल्यानंतर त्या तिघांनाही गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर आरोग्य विभाग बारीक नजर ठेवून आहे. एकात्मिक बाल विकास विभागाच्या पर्यवेक्षक प्रभा पाटील यांच्याकडे त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

जिल्ह्यात क्वॉरंनटाईन वाढतीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा/आष्टी (शहीद.)/ वडनेर : गेल्या ४०-४५ दिवसांपासून देशात व राज्यात कोरोना रूग्ण वाढत असताना वर्धा जिल्ह्याने ग्रीन झोन कायम राखण्यात यश मिळविले आहे. मात्र गेल्या २-३ दिवसात ग्रामीण भागात राज्याच्या व देशाच्या विविध भागातून येणाऱ्या नागरिकांचा ओघ वाढला आहे. त्यामुळे क्वॉरन्टाईन करण्यावर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणे मागचा मनस्ताप वाढणार आहे.
आष्टी तालुक्यातील जामनगर येथील तीघेजन नागपूर येथील मनीष नगरमध्ये काही कारणास्तव थांबले होते. ते मुळ गावी आष्टी येथे परत आल्यानंतर त्या तिघांनाही गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर आरोग्य विभाग बारीक नजर ठेवून आहे. एकात्मिक बाल विकास विभागाच्या पर्यवेक्षक प्रभा पाटील यांच्याकडे त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
या तिघांच्याही घरी भेट देवून त्यांच्या प्रकृतीचा अहवाल वरिष्ठांना सादर केला. यावेळी जामनगरचे उपसरपंच अंकित कावडे, अंगणवाडी सेविका निलमा परतेती उपस्थित होत्या. तर हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथेही सोमवारी नागपूरवरून विनापरवानगी आलेल्या एका इसमाला नागरिकांनी पकडले.
सदर इसम नागपूरवरून लपून आपल्या गावात पायी चालत आलेला होता. याबाबतची माहिती आशा वर्कर यांना देण्यात आली. त्यानंतर नायब तहसिलदार झिले यांच्या पथकाने याची सूचना भांडे यांना दिली. त्यांनी ग्रामीण रूग्णालयात सदर इसमाची तपासणी केली. व त्याला फुकटा जिल्हा परिषद शाळेच्या निवारागृहात १४ दिवसासाठी क्वॉरनटाईन करण्यात आले.
जिल्ह्यात ३ मे पर्यंत १ हजार ९१६ इसमांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये वर्धा तालुक्यात ५४६ सेलू तालुक्यात २८१, देवळी तालुक्यात १८७, आर्वी तालुक्यात १०४, आष्टी २९९, कारंजा ५५, समुद्रपूर २३२, हिंगणघाट २१२ नागरिकांना होमक्वॉरनटाईन करण्यात आले आहे.
केंद्र व राज्य सरकारने आता आपआपल्या गावाला जाण्याची परवानगी नागरिकांना दिली असल्याने मोठ्या प्रमाणावर वर्धा जिल्ह्यात नागरीक बाहेरून येत आहेत. त्यामुळे गृहविलगीकरणात राहणाऱ्यांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा भार वाढणार आहे.