वर्धेतून ५० कट्टे गव्हासह तांदूळ जप्त
By Admin | Updated: December 13, 2015 02:11 IST2015-12-13T02:11:22+5:302015-12-13T02:11:22+5:30
शासकीय धान्याचा काळाबाजार करणाऱ्या सेलू तालुक्यातील बेलगाव येथील स्वस्त धान्य दुकानाला गुरुवारी सील ठोकण्यात आले.

वर्धेतून ५० कट्टे गव्हासह तांदूळ जप्त
सेलूतील शासकीय धान्याचा काळाबाजार : पोलीस फरार आरोपींच्या मागावर
वर्धा : शासकीय धान्याचा काळाबाजार करणाऱ्या सेलू तालुक्यातील बेलगाव येथील स्वस्त धान्य दुकानाला गुरुवारी सील ठोकण्यात आले. या संदर्भात पोलिसांचा तपास सुरू असताना शनिवारी यात सहभागी असलेल्या एका व्यापाऱ्याच्या गोदामातून ५० कट्टे गहू व १० कट्टे तांदूळ असा एकूण ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आढळलेला मुद्देमाल याच दुकानातील असल्याचा संशय असला तरी त्याचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी शुक्रवारीच दोघांना अटक करण्यात आली असून इतर तीन आरोपींचा शोध विशेष पथकाचे पोलीस करीत आहेत.
पोलिसांच्या ताब्यात असलेला वर्धेतील धान्य व्यापारी मुकिंदा सोमनाथे व त्याचा चालक चंद्रशेखर सावळे यांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. यात त्यांनी गत काही दिवसांपूर्वी या प्रकरणात सहभागी असलेला धान्य व्यापारी पंकज चिथलोरे याच्या गोदामात सेलू येथे आलेले शासकीय धान्य पोहोचविल्याची माहिती पोलिसांना दिली. या माहितीवरून विशेष पथकाच्या पोलिसांनी सदर गोदामात धाड घातली. येथून मोठ्या प्रमाणात शासकीय धान्य जप्त करण्यात आले. शासकीय किमतीनुसार जप्त करण्यात आलेला धान्य साठा ४० हजार रुपयांचा असला तरी त्याची धान्य बाजारातील किंमत अधिक असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
सेलू तालुक्यातील इंदिरा महिला उत्पादक सहकारी संस्थेच्या नावे बेलगाव येथे स्वस्त धान्य दुकान मंजूर आहे. या दुकानात गरजवंतांकरिता येत असलेल्या शासकीय धान्याची अफरातफर होत असल्याचे गुरुवारी रात्री सेलूचे तहसीलदार डॉ. रवींद्र कोळी यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने केलेल्या कारवाईत उघड झाले. यामुळे संस्थेचे प्रमूख व सेलू येथील नगर पंचायतीचे उपाध्यक्ष चुडामण हांडे यांच्यासह वर्धेतील मुकिंदा सोमनाथे त्याच्या वाहनाचा चालक चंद्रशेखर सावळे वर्धेतील धान्य व्यापारी पंकज चिथलोरे व धान्य बाजारातील दलाल नितीन घाटे या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यातील मुकिंदा सोमनाथे व चंद्रशेखर सावळे या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली. या दोघांकडून आणखी माहिती मिळते काय, या दिशेने पोलिसांचा तपास सुरू असल्याची माहिती तपासी अधिकारी धनंजय सायरे यांनी दिली. (प्रतिनिधी)
सेलू तहसीलदारांना विक्री पुस्तिकेची प्रतीक्षा
या प्रकरणात तहसीलदारांसह पोलिसांनी एकत्र धाड घातली असता येथून काही कागदपत्र जप्त करण्यात आले. यापैकी साठा पुस्तिका व पावती पुस्तक तहसीलदारांच्या हवाली करण्यात आले. मात्र विक्री पुस्तिका त्यांना अद्याप मिळाले नाही. या कारवाईत पोलिसांनाही ती मिळाली नसल्याची माहिती आहे. विक्री पुस्तिका संथेच्या प्रमुखाच्या घरी असण्याची शक्यता आहे; मात्र संस्थेचा प्रमुख पसार झाला असल्याने त्याचा शोध सुरू आहे.
या कारवाईत साठा पुस्तिका हाती आली आहे. विक्री पुस्तिका मिळण्याची प्रतीक्षा आहे. ती मिळताच यात किती धान्याचा घोळ झाला याचा खुलासा होणे शक्य असल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.
कारवाई राजकीय षड्यंत्रातून असल्याची चर्चा
सेलू नगर पंचायत अध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपश्रष्ठींनी व्हीप जारी करून भाजप सदस्यांना दफ्तरी गटाला मतदार करण्याचे आदेश दिले होते. मात्र चुडामण हांडे यांनी पक्षादेश बाजुला सारुन काँग्रेसची हातमिळवणी केली. हीच बाब त्यांच्या अंगलट आली. त्यांच्यावरील कारवाई राजकीय षडयंत्र असल्याची चर्चा सेलूत जोरात सुरू आहे.