पिकांवर तांबेरा रोगाचा प्रकोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2015 01:59 IST2015-08-30T01:59:08+5:302015-08-30T01:59:08+5:30
यावर्षी पावसाळ्याची सुरुवात वेळेवर झाली; परंतु त्यानंतर एक महिना पावसाने दडी मारली.

पिकांवर तांबेरा रोगाचा प्रकोप
शेतकरी हवालदिल : उडीद, मूग, पिके पडली पिवळी
सेलगाव (लवणे) : यावर्षी पावसाळ्याची सुरुवात वेळेवर झाली; परंतु त्यानंतर एक महिना पावसाने दडी मारली. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे कशीबशी पिकांची वाढ झाली. सध्या परिस्थितीत पिके फुले व शेंगा धरण्याच्या अवस्थेत असतानांच सोयाबीन, उडीद, मुग या पिकांवर तांबेऱ्याचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
प्रारंभी हा रोग उडीद पिकांवरील पानांवर आढळला. उडीदावर पिवळे डाग पडायला सुरुवात झाली. त्यानंतर संपूर्ण पिकच पिवळे झाले. त्यानंतर याचाच परिणाम मुंग व मुख्य सोयाबीन पिकांवरही झाला. त्यामुळे शेतकऱ्यांची झोपच उडाली आहे. कारण या तांबेरा रोगांमुळे पिकांना धरलेल्या शेंगातील दाणे अपरिपक्व राहतात व वजनाने हलके राहतात. त्यामुळे उत्पन्नात मोठी घट होण्याची चिन्हे दिसून येत आहे.
गत तीन-चार वर्षांपासून निसर्गाच्या दृष्टचक्रात अडकलेला शेतकरी यातून बाहेर पडण्यासाठी धडपड करीत आहे. निसर्ग कधी अवकाळी पाऊस, गारपीट, कधी ओला दुष्काळ, अतिवृष्टी, कोरडा दुष्काळ अशा अनेक संकटाचा सामना करीत शेती करून उपजीविका करणाऱ्या शेतकऱ्यांवर या रोगामुळे पुन्हा मागचे दिवस पुढे येणार तर नाही, अशी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे जीवन जगणे कठीण होत आहे. कृषी विभागाने रोगग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे.(वार्ताहर)