जिल्हा प्रशासनाकडून दौऱ्यातील व्यवस्थेचा आढावा
By Admin | Updated: November 19, 2014 22:45 IST2014-11-19T22:45:40+5:302014-11-19T22:45:40+5:30
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी २६ नोव्हेंबर रोजी जी़एस. कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणात आयोजित शिक्षा मंडळाच्या सुवर्ण जयंती महोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. बजाजवाडी, गांधी ज्ञान मंदिर

जिल्हा प्रशासनाकडून दौऱ्यातील व्यवस्थेचा आढावा
वर्धा : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी २६ नोव्हेंबर रोजी जी़एस. कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणात आयोजित शिक्षा मंडळाच्या सुवर्ण जयंती महोत्सव कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. बजाजवाडी, गांधी ज्ञान मंदिर व सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमासही ते भेट देणार आहेत़ राष्ट्रपतींच्या आगमन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी एन. नवीन सोना व पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी आढावा घेतला.
राष्ट्रपती सेवाग्राम आश्रमात भेट देणार असून सामूहिक प्रार्थनेत सहभागी होणार आहे़ राष्ट्रपतींच्या हस्ते बकुळ वृक्ष लावण्यात येणार आहे. आश्रम परिसरात राष्ट्रपतींच्या आगमनापासून गांधीकुटी, आदि निवास तसेच परिसराच्या भेटीबाबत कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करण्यात आली. शिक्षा मंडळाच्या शतक महोत्सवी समारंभ जी.एस. कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणात आयोजित आहे़ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे़ यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्या सागरराव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिक्षा मंडळाचे अध्यक्ष राहुल बजाज, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी व मंडळाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार आहे़ कार्यक्रमाच्या व्यवस्थेसह बजाजवाडी, गांधी ज्ञान मंदिराच्या राष्ट्रपती भेटीबाबत व्यवस्थेची यावेळी पाहणी करण्यात आली. राष्ट्रपतींचे कॉलेजच्या मागील प्रांगणात विशेष तयार केलेल्या हेलीपॅडवर दुपारी आगमण होईल़ वर्धा येथील नियोजित कार्यक्रमास उपस्थित राहून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी वायुदलाच्या विशेष हेलीकॉप्टरने सायंकाळी येथून नागपूरसाठी प्रयाण करतील.
निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे, कार्यकारी अभियंता राजीव गायकवाड, शिक्षा मंडळाचे संजय भार्गव, उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, नियोजन अधिकारी प्रकाश डायरे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी सुरेंद्र भुयार, पोलीस व महसूल, आरोग्य आदी विभागांचे वरिष्ठ अधिकारी आढावा बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)