हिंगणघाट : सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानिवृत्त कर्मचारी भास्कर बाकरे यांच्या सेवानिवृत्तीची कागदपत्रे घरी न पोहोचविता त्यांना मृत दाखवून महालेखाकार नागपूर यांना परत पाठविण्यात आली़ यातून डाक विभागाचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.समुद्रपूर उपविभागातून ३० जून २०१४ रोजी सेवानिवृत्त झालेले बाकरे हिंगणघाट येथे संत तुकडोजी वॉर्डात राहत आहेत़ त्यांच्या निवृत्ती वेतनाची कागदपत्रे राज्य महालेखाकार विभागाने त्यांच्या निवासी पत्त्यावर पाठविली़ येथील पोस्टमनने मात्र सदर इसमाचा शोध घेतलाच नाही; पण लिफाफ्यावर मरण पावल्यामुळे सदर लिफाफा परत करण्यात येत असल्याचा शेरा मारून संबंधित विभागाला ४ मार्च २०१४ ला परत पाठविले़ सेवानिवृत्त होऊनही कागदपत्रे का आली नाहीत, याचा शोध घेण्यासाठी बाकरे यांनी शोधाशोध केली़ यात मार्च २०१४ मध्येच सदर प्रकरणाची कागदपत्रे विभागीय कार्यालयाला पोहोचल्याची माहिती त्यांना मिळाली़ यावरून नागपूरचे महालेखाकार कार्यालय गाठून त्यांनी याबाबत चौकशी केली़ यात सदर बाब उघडकीस आली. या प्रकारामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला़ टपाल खात्याने अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, याची दखल संबंधितांनी घ्यावी, याकडे लक्ष वेधण्यात आले.(तालुका प्रतिनिधी)
मृत दाखवून टपाल पाठविले परत; पोस्टाचा बेजबाबदारपणा
By admin | Updated: December 18, 2014 02:11 IST