शाळा बंद आंदोलनाला १०० टक्के प्रतिसाद
By Admin | Updated: December 10, 2015 02:14 IST2015-12-10T02:14:45+5:302015-12-10T02:14:45+5:30
शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांवर शासनाकडून अन्याय होत आहे. तो दूर करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटक संघटनांनी मिळून शासनाच्या विरोधात ...

शाळा बंद आंदोलनाला १०० टक्के प्रतिसाद
२०५ शाळा बंद : विविध संघटना सहभागी
वर्धा: शिक्षण क्षेत्रातील सर्वच घटकांवर शासनाकडून अन्याय होत आहे. तो दूर करण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील सर्व घटक संघटनांनी मिळून शासनाच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीचे गठन केले. समितीच्यावतीने ९ आणि १० डिसेंबर रोजी संस्थेच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. बुधवारी सर्व मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या सर्व संस्थांनी शाळा बंद ठेवत बंद १०० टक्के यशस्वी केला.
संस्थाचालकांचे मूलभूत अधिकार काढून घेणे, शिक्षकांचा अशैक्षणिक कामाचा बोजा वाढविणे, शिक्षकेत्तरांसाठी नेमलेल्या शासनाच्या समितीचा अहवाल मंजूर न करणे, कला, क्रीडा व कार्य शिक्षण शिक्षकांची पदे रद्द करणे यासारखे अनेक अन्यायकारक निर्णय राज्य शासनाने घेतल्याने सदर बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील एकूण २०५ शाळा बुधवारी बंद होत्या. गुरुवारीही हा बंद पाळण्यात येणार आहे.
सदर आंदोलनात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, विमाशि संघटना सर्व जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ, जिल्हा शिक्षण संस्था संचालक संघ, जिल्हा प्रजासत्ताक शिक्षक संघ, खासगी प्राथमिक संघटना, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, वर्धा जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षक संघटना, वर्धा जिल्हा कला अध्यापक संघटना इत्यादी सहभागी आहेत.(शहर प्रतिनिधी)