१९ जणांचा नेत्रदानाचा संकल्प
By Admin | Updated: June 12, 2016 01:51 IST2016-06-12T01:51:26+5:302016-06-12T01:51:26+5:30
‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ ही म्हण सार्थ ठरवित वर्धेतील १९ जणांनी मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प केला.

१९ जणांचा नेत्रदानाचा संकल्प
दृष्टीदान दिन : सामान्य रुग्णालयात कार्यक्रम
वर्धा : ‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ ही म्हण सार्थ ठरवित वर्धेतील १९ जणांनी मरणोपरांत नेत्रदानाचा संकल्प केला. जिल्हा सामान्य रुग्णालयात आयोजित दृष्टीदान दिन कार्यक्रमात त्यांनी तसे इच्छापत्र भरून दिले.
या कार्यक्रमात डॉ. निवृत्ती राठोड, डॉ. एम. बी. सुटे, डॉ. रंजना वाढीवे, सुमेध पखाले, प्रियंका वंडकार, पूजा राठोड, मनीषा बावणे, मीनाक्षी तोडासे, अंकुश कांचनपुरे, नानाजी कुंभलवार, अस्पाक अली लियाकत अली, शांता राऊत, प्रशांत धोंगडे, पवन लाडवे यांनी नेत्रदानाचा संकल्प केला.
डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृती दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात १० जून हा दिवस दृष्टीदान दिन म्हणून पाळला जातो. या निमित्ताने जिल्हा सामान्य रुग्णालयांतर्गत जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीच्या संयुक्त विद्यमाने बाह्यरुग्ण विभागामध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. बी. राठोड, , जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. एम.बी. सुटे, वैद्यकीय अधिकारी नेत्र डॉ. रंजना वाढीवे, अधिसेविका पुनसे, नोडल अधिकारी व्ही.सी. रामटेके, कक्ष परिसेविका ढोबळे यांची उपस्थित होते.
प्रास्ताविकात नेत्र शल्यचिकित्सक डॉ. सुटे यांनी नेत्रदान, मोतीबिंदू शस्त्रक्रियेविषयी माहिती दिली. परिसेविका ढोबळे यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी.डी. मडावी, यांनी ‘मरावे परी नेत्ररूपी उरावे’ या म्हणीनुसार जनतेला जास्तीत जास्त नेत्रदानाचा संकल्प करण्याचे आवाहन केले. डॉ. राठोड यांनी उपस्थितांना नेत्रदानाचा संकल्प करून मरणोपरांत नेत्रदानाचे इच्छापत्र भरून देण्यास सहकार्य करून अंधत्व नियंत्रण करण्यास मदत करावी, असे आवाहन यावेळी केले.
संचालन नेत्रदान समुपदेशक पी.एस. काकडे यांनी केले तर आभार नेत्रचिकित्सा अधिकारी ए.एस. वरघट यांनी केले. कार्यक्रमाकरिता दिनेश ठाकरे, मंगेश राऊत, कर्मचारीवृंद आणि रुग्ण उपस्थित होते.(प्रतिनिधी)