डोरली गावातील महिलांचे दारूबंदीसाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन
By Admin | Updated: July 24, 2015 01:54 IST2015-07-24T01:54:41+5:302015-07-24T01:54:41+5:30
एकेकाळी शेतकरी आत्महत्या आणि त्यानंतर शेतकरी, ग्रामस्थांनी केलेल्या ‘गावे विकणे आहे’ या आंदोलनाने चर्चेत आलेल्या डोरली गावातही अवैध दारूविक्री फोफावली आहे.

डोरली गावातील महिलांचे दारूबंदीसाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन
एकेकाळी शेतकरी आत्महत्या आणि त्यानंतर शेतकरी, ग्रामस्थांनी केलेल्या ‘गावे विकणे आहे’ या आंदोलनाने चर्चेत आलेल्या डोरली गावातही अवैध दारूविक्री फोफावली आहे. यामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. गावात गावठी दारू तर वायफड पारधी बेड्यामुळे सहज उपलब्ध होते. शिवाय देशी, विदेशी दारूही गावात विकली जात असून युवक मद्याच्या आजारी जात आहेत.
डोरली या गावात शाळेच्या परिसरातही दारूविक्री होत आहे. याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या; पण दारूविक्रीकडे कुणीही लक्ष देत नसल्याचेच दिसून येत आहे. परिसरातील अनेक गावांत दारूबंदीवर अंमल करण्यात आला आहे. यामुळे त्या गावांतील मद्यपी डोरलीकडे वळत असल्याचेही दिसून येत आहे. पारधी बेडा जवळ असल्याने गावठी दारू सहज उपलब्ध होते. परिणामी, मद्यपिंची संख्या वाढली असून गावातील वातावरण दूषित होत आहे. यामुळे गावात दारूबंदी करावी, अशी मागणी महिलांनी केली.
याबाबत मंगळवारी पोलीस अधीक्षक गोयल यांना निवेदनही देण्यात आले. यावेळी जि.प. सदस्य मनोज चांदुरकर, बंडू ओंकार, शोभा जारूंडे, विशाखा जारूंडे, आम्रपाली लितपणे, रंजना पाटील, सुकेशनी गायकी, प्रतीभा गायकी, चंद्रा गायकी, मुक्ता मोहिते, अर्चना परतेकी, माला गोंडाणे, प्रज्ञा जारूंडे, कमल गोडाणे, अर्चना पाटील आदी महिला उपस्थित होत्या.
ठाणेदाराच्या उपस्थितीत दारूबंदीचा निर्णय
रोहणा येथून जवळच असलेल्या गौरखेडा गावात तंटामुक्त गाव समिती व महिला मंडळांनी एकत्रित येऊन गावातून दारू हद्दपार करण्याचा निर्णय घेतला. ठाणेदाराच्या उपस्थितीत ग्रामस्थांचा हा निर्णय सभेतून अंमलात आला आणि दुसऱ्या दिवशी गावातील दारू नाहीशी झाली. यामुळे समाधान व्यक्त होत आहे.
तंटामुक्त ग्राम समिती, महिला मंडळ आणि ग्रामस्थांनी सोमवारी गौरखेडा येथे संयुक्त सभा आयोजित केली होती. खरांगणा येथील ठाणेदार पांडे, ग्रा.पं. सदस्य संतोष कुरझडकर, भय्याजी डोळे, पोलीस पाटील गोवर्धन डोळे, तंटामुक्तीचे दिवाकर बिजवार, कोतवाल दातार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी गावातील दारू पूर्णत: हद्दपार करून दारूबंदी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी उपस्थितांसमोर कथन केला. यावर ठाणेदार पांडे यांनी निर्णयाचे स्वागत करून ग्रामस्थांना सर्र्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. ग्रामस्थांनी दारूबंदीचा निर्णय युवापिढी वाचविण्याकरिता घेतला आहे, असे सांगितले. पूर्वी गाव परिसरात दारूची निर्मिती होत होती. त्याचे दुष्परिणाम जाणवत होते. यामुळेच गावात दारूबंदी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आल्याची घोषणा सभेत करण्यात आली.
सोमवारी सभा पार पडल्यानंतर मंगळवारी दारू हद्दपार करण्याचे काम महिला, पुरूषांसह तरूणांनी केले. गावात ५ महिला मंडळे असून सर्व सदस्यांनी गावात एकोपा व शांती निर्माण व्हावी, यासाठी हा कार्यक्रम राबविला. तंटामुक्त ग्राम समितीच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी दारूमुक्तीबाबत समाधान व्यक्त केले.