मूलनायक मूर्ती व मानस्तंभाची प्रतिष्ठा सोहळा
By Admin | Updated: February 18, 2015 01:55 IST2015-02-18T01:55:06+5:302015-02-18T01:55:06+5:30
जिनाभिषेक, मोक्षविधी, विश्वशांतीहवन, मोक्षविधी, कैलाश पर्वतावर सूर्यदेवांच्या हस्ते दीप प्रज्वलन, गुरूपूजन, गजराज मिरवणूक, चांदीच्या रथात विराजमान झालेल्या मूलनायक ...

मूलनायक मूर्ती व मानस्तंभाची प्रतिष्ठा सोहळा
पुलगाव : जिनाभिषेक, मोक्षविधी, विश्वशांतीहवन, मोक्षविधी, कैलाश पर्वतावर सूर्यदेवांच्या हस्ते दीप प्रज्वलन, गुरूपूजन, गजराज मिरवणूक, चांदीच्या रथात विराजमान झालेल्या मूलनायक आदीनाथ स्वामींच्या मूर्तीची असंख्य भाविकांच्या उपस्थितीत शोभायात्रा निघाली होती. यानंतर मोक्षकल्याणक विधान संपन्न होऊन विजयगोपाल येथील पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सवाचा समारोप करण्यात आला.
अतिशयक्षेत्र विजयगोपाल येथील जैन मंदिरात आचार्य विमलसागर महाराजाचे आशिर्वादाने विशाल जिनालयाचे काम करून लाल पाषाणाची भगवान पार्श्वनाथांची मूर्ती, २४ तीर्थंकरांच्या वेदी व महातिर्थराज सन्नेदारीखरजींची सुंदर प्रतिकृती असे जैन मंदिर याच वर्षात निर्माण करण्याचा संकल्प केला. येथे संत क्षेत्राचा अधिक विकास करण्याचा संकल्प मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांनी समारोपीय गुरूवचनामृतातून व्यक्त केले.
पंचकल्याणक महोत्सवात ज्ञानकल्याणक प्रसंगी आकर्षक असे चोवीस तीर्थकरांचे समवशरण तयार करण्यात आले. केवलज्ञानविधी दीक्षाकल्याणक, दिव्यध्वनी ज्ञानकल्याणक पूजन होवून रत्नवृष्टी करण्यात आली. शोभायात्रा, आरती, शास्त्रपूजन, महामूनी आदिनाथांचा आहार व भाविकांची प्रश्नोत्तरी झाली. मंगळवारी सकाळी जिनाभिषेक होवून मोक्षकल्याणकाचा आरंभ झाला. आकर्षक व्यासपीठावर कैलाश पर्वत तयार करून मुनीश्री सुविरसागरजींनी अग्नीमंत्र टाकून सुर्यदेवांच्या उपस्थितीत मोक्षकल्याण पुजन केले. विश्वशांतीहवन व महाराजांचे प्रवचन झाल्यानंतर भगवान आदीनाथस्वामींची प्रतिमा चांदीच्या रथात विराजमान करण्यात आली. मंगल वाद्यवृंदाच्या स्वरात महोत्सव स्थळापासून जैन मंदिरापर्यंत मिरवणूक काढली. टिकमगढ येथील संजय साजन व कलावंतानी साथ केली.
पाषाणमूर्तीला वेदीशुद्धी, मंत्रशुद्धी करून देवत्वाकडे नेण्याच्या पंचकल्याणक महोत्सवाच्या समारोपात भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी खा.रामदास तडस यांनी मुनीश्रीचे आशीर्वाद घेतले. आपणा सर्वांच्या सहकार्याने या क्षेत्रातील लोकांची सेवा करून जनसेवा हीच ईश्वरसेवा होय, असे सांगून मुनीश्रींचे आशिर्वचन जनमाणसापर्यंत पोहचवणार असल्याचे तडस यांनी बोलताना सांगितले. याप्रसंगी माजी जि.प. सदस्य दिलीप अग्रवाल, डॉ. विजय राऊत यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. या महोत्सवाला विदर्भातील समाजबांधव उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)