शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
By Admin | Updated: July 23, 2014 00:09 IST2014-07-23T00:09:24+5:302014-07-23T00:09:24+5:30
अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील कार्यरत शिक्षक वैयक्तिक मान्यतेअभावी वेतनापासून वंचित आहे. मागील दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून ही समस्या प्रलंबित आहे.

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन
वर्धा : अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील कार्यरत शिक्षक वैयक्तिक मान्यतेअभावी वेतनापासून वंचित आहे. मागील दोन वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून ही समस्या प्रलंबित आहे. २० जून २०१४ च्या शासन निर्णयानुसार या मागण्यांकरिता शिबिराचे आयोजन करुन वैयक्तिक मान्यता देण्यात यावी, अशी मागणी तक्रार निवारण समितीच्यावतीने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संजय डोर्लीकर यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
शिक्षण विभागाचे २ मे, २०१२ पूर्वी पद भरण्याचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन शिक्षकांची पदभरती करण्यात आली. परंतु ३ ते ५ आॅक्टोबर २०११ या कालावधीत विशेष पटपडताळणी मोहीम राबवून २ मे, २०१२ च्या शासन निर्णयानुसार पदभरती बंद करण्यात आली. २ मे पूर्वी पदभरण्याची ना हरकत प्रमाणपत्र दिलेल्या व त्यानंतर नियुक्त्या केलेल्या शिक्षकांचे मान्यता प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा आदेश ६ मे २०१२ रोजी शासनाने दिला. ६ मे २०१२ च्या शासन निर्णयाप्रमाणे ठरावीक शाळांना शासनाने मान्यता दिली.
२ मे २०१२ पूर्वी ना हरकत प्रमाणपत्र व पूर्ण निवड प्रक्रिया पार पाडून २ मे २०१२ नंतर नियुक्तया केलेल्या कर्मचाऱ्यांचा या शासन निर्णयाशी कोणताही संबंध नसताना नियुक्त कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता देण्याबाबत शिबिराचे आयोजन करण्यात आले नाही. शिष्टमंडळात अजय भोयर, प्रकाश दुबे, रहिम फकीर, इंद्रजीत ढोले आदी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)
पावसामुळे रस्त्यांची पोलखोल
वर्धा : जिल्ह्यातील गावांना जोडणाऱ्या अप्रोच मार्गांची आधीच दैनावस्था आहे. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या पावसामुळे या रस्त्यांची पार वाट लागलेली आहे. यामुळे अनेक गावकऱ्यांना शहराला ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याबाबत पावसापूर्वीच अनेक गावातील नागरिकांनी रस्त्यांची दुरुस्ती करण्यासंदर्भात अनेकदा मागण्यांची निवेदने संबंधित विभागाकडे सादर करण्यात आली. मात्र बहुतांश गावांच्या रस्त्यांचे बांधकाम वा दुरुस्तीच करण्यात न आल्यामुळे पावसाळ्यात ही समस्या गंभीर रुप धारण करुन आहे. (स्थानिक प्रतिनिधी)