नागपूर-तुळजापूर व बुटीबोरी-वर्धा रस्त्यांची दुरूस्ती करा
By Admin | Updated: October 6, 2016 00:41 IST2016-10-06T00:41:38+5:302016-10-06T00:41:38+5:30
नागपूर, बोरी, तुळजापूर आणि बुटीबोरी ते वर्धा या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे.

नागपूर-तुळजापूर व बुटीबोरी-वर्धा रस्त्यांची दुरूस्ती करा
सोशल फोरमची मागणी : जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून साकडे
वर्धा : नागपूर, बोरी, तुळजापूर आणि बुटीबोरी ते वर्धा या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली आहे. बुटीबोरी ते वर्धा मार्गावर २२/० ते ७७/२०० किमी या दरम्यान रस्ता खड्ड्यातच गेल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या रस्त्यांची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी वर्धा सोशल फोरमद्वारे करण्यात आली. याबाबत अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
बुटीबोरी ते वर्धा रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या रस्त्याकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. रस्त्याने वाहन चालविताना समोरील खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक अपघात होत आहेत. वर्धा ते बुटीबोरी प्रवास करीत असताना माणसाच्या शरीराच्या हाडांना मोठ्या प्रमाणात दुखापत होत आहे. अनेकांना मनक्याचे व पाठीचे आजार अडले आहेत. त्याचप्रमाणे गाड्यांची व टायरची झीज होत आहे. या सर्व बाबीला जबाबदार कोण, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
याच रस्त्याचे ७४ किमीपर्यंत डांबरीकरण १४ वर्षांपूर्वी झाले होते; पण सरफेस अजूनही चांगल्या स्थितीत आहे. याचाच अर्थ रस्ता हा वाहतुकीने खराब होत नाही तर डांबरीकरण करताना कमी डांबर वापरल्याने खराब होतो, हे निश्चित. खड्डेही डांबराने योग्यरित्या भरल्या जात नाही. पॅचेस वारंवार उखडतात. यामुळे पॅचेस योग्य करावे, रस्त्याचे साईडबर्म अनेक ठिकाणी दबलेले आहे, त्यामुळे अपघात होतो, ते भरण्यात यावे आदी मागण्या करण्यात आला. निवेदन देताना वर्धा सोशल फोरमचे सचिव अविनाश सातव, सदस्य प्रदीप बजाज, रवींद्र कडू, सुभाष पाटनकर, अविनाश सेलूकर, पवन बोधनकर व इतर सदस्य उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)