देरडा येथील बोर नदीवरील क्षतिग्रस्त पुलाची दुरूस्ती करा
By Admin | Updated: August 26, 2016 02:05 IST2016-08-26T02:05:03+5:302016-08-26T02:05:03+5:30
मांडगाव सर्कलमधील सावंगी, देरडा येथील बोर आणि धाम नदीवरील सिमेंट काँक्रीटचा रपटा निकृष्ट बांधकामामुळे मागील पुरात वाहून गेला.

देरडा येथील बोर नदीवरील क्षतिग्रस्त पुलाची दुरूस्ती करा
तहसीलदारांना साकडे : शेतकऱ्यांना आवागमनास अडचण
समुद्रपूर : मांडगाव सर्कलमधील सावंगी, देरडा येथील बोर आणि धाम नदीवरील सिमेंट काँक्रीटचा रपटा निकृष्ट बांधकामामुळे मागील पुरात वाहून गेला. यामुळे ५० गावांचा संपर्क तुटलेला आहे. हा रपटा पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता. या पुलाची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. याबाबत समुद्रपूर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे विनोद हिवंज व शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन सादर केले.
सावंगी, देरडा येथील बोर व धाम नदीवरील पाच वर्षांपूर्वी बनविलेला सिमेंट काँक्रीटचा रपटा निकृष्ट बांधकामामुळे पुराच्या पाण्याने वाहून गेला. यामुळे तेथील ५० गावांचा संपर्क तुटला. या प्रकरणात संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. जीर्ण झालेल्या रपट्याची दुरूस्ती करण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा निवेदने दिली; पण त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. हा मार्ग वाघोली ते सिंदी (रेल्वे) कडे जाण्याकरिता कमी अंतराचा आहे. शिवाय शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मांडगाव व समुद्रपूर येथे याच मार्गाने ये-जा करावी लागते; पण पूल वाहून गेल्याने रहदारीच ठप्प झाली आहे. दैनंदिन व्यवहार करतानाही अडचणीचा सामना करावा लागत आहे.
क्षतिग्रस्त पुलाचा परिसरातील शेतकऱ्यांनाच अधिक फटका बसत आहे. यामुळे पुलाची त्वरित दुरूस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी विनोद हिवंज, श्याम देशमुख, विठ्ठल लेंडे, दीपक उईके, अनिरूद्ध मुंजेवार, राजकुमार वाघमारे, झाडे, दत्ता खेकडे, राजेंद्र डंभारे, अनिल मसकर, बाबाराव इतवारे, महादेव मसराम, मनोज बिसवासे, आकाश आत्राम आदी उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)