५३ हजारांवर शेतकऱ्यांच्या कर्जाचे होणार पुनर्गठन

By Admin | Updated: April 29, 2016 02:09 IST2016-04-29T02:09:53+5:302016-04-29T02:09:53+5:30

जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी टंचाई जाहीर झाली आहे. यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे.

Reorganization of farmers' debt to 53 thousand | ५३ हजारांवर शेतकऱ्यांच्या कर्जाचे होणार पुनर्गठन

५३ हजारांवर शेतकऱ्यांच्या कर्जाचे होणार पुनर्गठन

कर्जाची रक्कम ४७४ कोटी रुपये : सर्व गावांची पैसेवारी ५० च्या आत
वर्धा : जिल्ह्यात सलग तिसऱ्या वर्षी टंचाई जाहीर झाली आहे. यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. यावर्षी ५३ हजारांवर शेतकरी खातेदार पुनर्गठणासाठी पात्र असून ४७४ कोटी रुपयांच्या रकमेचे पुनर्गठण केले जाणार आहे.
यावर्षी जवळपास सर्वच गावांची पैसेवारी ५० पैशांच्या आत निघाली आहे. यामुळे वर्धा जिल्ह्याचा टंचाईग्रस्त जिल्ह्यांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. परिणामी, पीक कर्जाच्या सक्तीच्या वसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. कर्जाची वसुली न करता शेतकऱ्यांनी उचललेल्या कर्जाचे पुनर्गठन करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ५३ हजार ८६७ शेतकरी यास पात्र असून त्याची रक्कम ४७४ कोटी ३७ लाख रुपये आहे. शेतकऱ्यांंच्या कर्जाचे पुनर्गठन करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाकडून होत आहे; पण सलग तीन वर्षांपासूनच्या दुष्काळी परिस्थितीत शेतीचा खर्च हाताबाहेर गेला आहे. उत्पन्न कमी, न मिळणारे भाव, त्यातून कोलमडलेल्या आर्थिक गणिताने थकबाकीदारांची संख्या वाढत आहे. यात पुनर्गठन शेतकऱ्यांना कितपत उपयुक्त आहे, हा प्रश्नच आहे. खरीप हंगामात ३० हजार ३२३ शेतकऱ्यांनी २६३ कोटी ६ लाख रुपये कर्जाची उचल केली. सोबतच ३२ हजार २६४ शेतकरी खातेदारांचे नुतनीकरण करून २८१ कोटी ७६ लाख रुपये कर्र्ज उपलब्ध करण्यात आले. ६२ हजार ५८७ शेतकरी खातेदारांना ५४४ कोटी ८२ लाख रुपयांचे कर्ज बँकांनी दिले होते. यातील ५३ हजार ८३७ शेतकरी पुनर्गठणासाठी पात्र आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.(कार्यालय प्रतिनिधी)

कर्जाचा डोंगर वाढणार ?
टंचाई जाहीर झाल्यानंतर कर्जाचे पुनर्गठन केले जाते. यापूर्वीही कर्ज पुनर्गठन झाले. त्या वेळच्या कर्जाची परतफेड व्हायची असताना नव्याने पुनर्गठन करीत कर्ज वाढविले जाणार आहे. गतवर्षी शेतकऱ्याने एक लाख रुपये कर्ज घेतले असेल तर त्या रकमेचे पुनर्गठन म्हणजेच पाच हप्ते पाडले जातील. यात शेतकऱ्यांना कर्ज फेडावे लागेल. पुनर्गठनानंतर शेतकऱ्यांना मागील वेळी उचललेल्या रकमेएवढे वा ऐपतीप्रमाणे कर्ज दिले जाईल. नवीन कर्जाची भर पडणार असल्याने परतफेड कशी करणार, हा प्रश्न आहे.
आठ हजारावर शेतकऱ्यांनी केला कर्जाचा परतावा
टंचाईची स्थिती असली तरी अनेक शेतकरी वेळेवर परतफेड करण्याचा प्रयत्न करतात. जिल्ह्यातील ८ हजार ७५० शेतकऱ्यांनी ३१ मार्चपर्यंत ७० कोटी ४५ लाख रुपयांची परतफेड केली. यामुळे अन्य शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन केले जाणार आहे. पुनर्गठन केल्यानंतर पहिला हप्ता जून २०१७ मध्ये भरावा लागणार आहे.

Web Title: Reorganization of farmers' debt to 53 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.