पुरलेला मृतदेह बाहेर काढून वेदांतीचे ‘पीएम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 22:10 IST2018-11-26T22:09:28+5:302018-11-26T22:10:36+5:30
सात वर्षीय मृत मुलीवर उपचार सुरू असल्याचा आव आणत मृताच्या कुटुंबीयांची फसगत केल्याची तक्रार देवराव बारसकर यांनी सावंगी पोलीस ठाण्यात दाखल केली होती.

पुरलेला मृतदेह बाहेर काढून वेदांतीचे ‘पीएम’
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सात वर्षीय मृत मुलीवर उपचार सुरू असल्याचा आव आणत मृताच्या कुटुंबीयांची फसगत केल्याची तक्रार देवराव बारसकर यांनी सावंगी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्यावर उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांकडून लेखी सूचना प्राप्त होताच सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास सावंगी पोलिसांनी नायब तहसीलदार कातोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयातील तज्ज्ञ वैद्यकीय चमूकडून जमिनीत पुरलेला सात वर्षीय वेदांतीचा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मृत वेदांतीच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती.
ताप आल्याने वेदांतीला सुरूवातीला तिच्या कुटुंबियांनी डॉ. तळवेकर यांच्या रुग्णालयात नेले. तपासणी अंती वेदांतीला डॉ. पावडे यांच्या रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. डॉ. पावडे यांच्या रुग्णालयात वेदांतीला नेले असता तिची प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे तिला सावंगी (मेघे) येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वेदांतीचा मृत्यू होऊनही त्याबाबतची माहिती वेळीच डॉक्टरांनी वेदांतीच्या कुटुंबियांना न देता उपचार सुरू असल्याचे सांगितले. वेदांतीच्या मृत्यूला मनमर्जी काम करणारे डॉक्टर जबाबदार असून त्यांच्यावर कठोर करवाई करण्याची मागणी देवराव बारसकर यांनी सावंगी पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. त्यावर उपविभागीय न्याय दंडाधिकाºयांकडून लेखी सूचना मिळाल्यावर नायब तहसीलदार कातोरे यांच्या उपस्थितीत बोरगाव (मेघे) येथील स्मशानभूमीत जमिनीत पुरवून असलेला वेदांतीचा मृतदेह सावंगी पोलिसांनी बाहेर काढला. डॉ. प्रविण झोपाटे, डॉ. शरजील खान, डॉ. मनिष जैन, डॉ. भरत पाटील यांच्या चमूने मृतक वेदांतीचे शवविच्छेदन केले.
बोरगाव (मेघे) च्या स्मशानभूमीत बघ्यांची गर्दी
शवविच्छेदनासाठी वेदांतीचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढल्या जात असल्याची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने बोरगाव (मेघे) येथील स्मशानभूमीत बघ्यांची एकच गर्दी झाली होती. तेथे असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बघ्यांची गर्दी बाजूला सारून शवविच्छेदनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रयत्न केले.
देवराव बारसकर यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्हाला उपविभागीय न्याय दंडाधिकाऱ्यांकडून लेखी सूचना प्राप्त झाल्या. त्यानुसार आज मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन केले जात आहे. वेदांतीच्या मृत्यू बाबत तिच्या वडिलांसह कुटुंबियांचे काही आरोप आहेत. शवविच्छेदन अहवालानंतर चित्र स्पष्ट होईल. सध्या तपास सूरू आहे.
- दत्तात्रय गुरव, ठाणेदार, सावंगी (मेघे).