अपूर्ण विहिरींच्या देयकाची प्रतिपूर्ती

By Admin | Updated: July 30, 2015 01:57 IST2015-07-30T01:57:37+5:302015-07-30T01:57:37+5:30

महात्मा ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विहिरी देण्यात आल्या. यातील अटींमुळे अनुदानाचा घोळ होत असल्याचे समोर आले आहे. ..

Reimbursement of incomplete wells bills | अपूर्ण विहिरींच्या देयकाची प्रतिपूर्ती

अपूर्ण विहिरींच्या देयकाची प्रतिपूर्ती

वालधूर येथील प्रकार : १४ विहिरींपैकी दोन विहिरी राहिल्या अर्धवटच
वर्धा : महात्मा ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना विहिरी देण्यात आल्या. यातील अटींमुळे अनुदानाचा घोळ होत असल्याचे समोर आले आहे. हिंगणघाट तालुक्यातील वालधूर येथेही १४ विहिरींपैकी दोन विहिरी अपूर्ण राहिल्या; पण त्यांच्या देयकांची प्रतिपूर्ती करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पंचायत समितीच्या चौकशी अहवालातही नियमबाह्य काम झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
वालधूर येथील प्रशांत मेश्राम हा शेतकरी आजोबा दादा बारसू मेश्राम यांच्या जमिनीची वाहिती करतो. त्यांच्या शेतात २०११-१२ मध्ये मनरेगा योजनेंतर्गत विहीर मंजूर झाली होती. या विहिरीचे खोदकाम व बांधकाम करण्यासाठी तत्कालीन ग्रामसेवक आर.एन. मुजबैले यांनी ३ हजार ६०० रुपये मस्टर शुल्काची मागणी केली. शेतकऱ्याने ते अदा केले. याचे बिल देण्याचे कबूल करण्यात आले; पण ते अद्याप देण्यात आले नाही. यानंतर सचिवांनी २ हजार ८०० रुपये व्हॅटच्या रकमेची मागणी केली. ही रक्कमही शेतकऱ्याने दिली. दरम्यानच्या कालावधीत सदर शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीचे २५ फुट खोदकाम झाले. त्याचे तीन मस्टर मिळून ५२ हजार ९२६ मजुरांच्या नावाने जमा झाले; पण यानंतर सदर सचिवांनी १० हजार रुपयांची मागणी केली. ६ हजार ४०० रुपये यापूर्वी दिल्याने व सदर शेतकऱ्याची आर्थिक स्थिती बेजाची असल्याने ती रक्कम देता आली नाही. यावर पैसे दिले नाही तर विहिरीचे पुढील काम होणार नाही, असे सचिवांनी सांगितल्याचे शेतकऱ्याने तक्रारीत नमूद केले. यानंतर विहिरीचे बांधकाम करण्यास टाळाटाळ करण्यात आली. याबाबत वारंवार विचारणा केल्यानंतरही बांधकाम केले नाही. दरम्यान, ग्रामसेवक मुजबैले यांची काचनगाव येथे बदली झाली.
यामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्याने गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली. तक्रारीवरून झालेल्या चौकशीत तत्कालीन ग्रामसेवकाने विहिरीचे बांधकाम पूर्ण झाल्याचे दाखवून १ लाख २१ हजार ८१८ रुपये खर्च दाखविल्याची बाब उघड झाली. सदर शेतकऱ्याच्या विहिरीचे २५ फुट व्यास व २२ फुट खोलीचे काम झालेले आहे. शिवाय बांधकाम झालेले नसल्याने सदर विहीर अर्धवट स्थितीत आहे. असे असताना संपूर्ण काम झाल्याची नोंद घेण्यात आली. ही बाब नियमबाह्य असल्याचे चौकशी अहवालात गटविकास अधिकाऱ्यांनी नमूद केले. या प्रकरणात ग्रामसेवक मुजबैले कारवाईस पात्र असल्याचेही नमूद केले आहे; पण कारवाई झाली नाही. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्याने जि. प. उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (पंचायत) निवेदनातून केली आहे.(कार्यालय प्रतिनिधी)
मूल्यांकन आणि काम न करताच दाखविला खर्च
सदर शेतकऱ्याच्या विहिरीच्या बांधकामात कुशल कामावर ग्रामपंचायत अभिलेखावर ५१ हजार १६८ रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. हा खर्च प्रत्यक्ष काम न करता तसेच साहित्याची खरेदी न करता करण्यात आल्याचे चौकशी अहवालात नमूद करण्यात आले. मूल्यांकनाचा आधार न घेता पंचायत समितीकडून कुशल साहित्याची रक्कम प्राप्त करून कुशल कामावर खर्च करण्यात आला. यासाठी तांत्रिक पॅनल अधिकारी, शाखा अभियंता यांच्याकडून मूल्यांकन केले नाही. शिवाय कामही केले नाही. यामुळे हा खर्च नियमबाह्य व वसूलपात्र असल्याचेही नमूद केले आहे. यास ग्रामसचिव मुजबैले व तत्कालीन सरपंच छबू बाळबुधे जबाबदार असल्याचेही नमूद आहे.
वालधूर येथे एकूण १४ विहिरींची कामे हाती घेतली होती. यापैकी १२ विहिरी पूर्ण झाल्या असून दोन विहिरी अपूर्ण राहिल्या होत्या. याबाबत वरिष्ठांना अहवालही पाठविला आहे. यातील एक विहीर आता पूर्ण झाली आहे; पण मेश्राम यांच्या विहिरीचे ११ हजार ७२० रुपयांचे साहित्य त्यांनी दुकानदारांकडून आणून परस्पर विकले. यामुळे त्यांची विहीर अद्याप अपूर्ण राहिली आहे. याबाबत मी अहवाल सादर केला आहे.
- आर.एन. मुजबैले,
ग्रामसेवक, ग्रा.पं. काचनगाव.

Web Title: Reimbursement of incomplete wells bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.