डाटा एन्ट्री आॅपरेटरला नियमित मानधन द्या
By Admin | Updated: November 8, 2014 22:43 IST2014-11-08T22:43:04+5:302014-11-08T22:43:04+5:30
केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयांतर्गत ई.पी.आर.आय. हा प्रकल्प सर्व राज्यामध्ये राबविला जात आहे. महाआॅनलाईन अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये सर्व कामे संगणकीकृत करण्यासाठी डाटा एट्री

डाटा एन्ट्री आॅपरेटरला नियमित मानधन द्या
वर्धा : केंद्र शासनाच्या पंचायत राज मंत्रालयांतर्गत ई.पी.आर.आय. हा प्रकल्प सर्व राज्यामध्ये राबविला जात आहे. महाआॅनलाईन अंतर्गत ग्रामपंचायतींमध्ये सर्व कामे संगणकीकृत करण्यासाठी डाटा एट्री आॅपरेटर मार्फत केली जातात. परंतु त्यांचे मानधन महाआॅनलाईनमार्फत नियमित केले जात नसल्याने ते नियमित करण्याची मागणी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना डाटा एंट्री आॅपरेटर युनियनच्या वतीने करण्यात आली.
महाआॅनलाईन ही ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर कार्यतर आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार कंपनीद्वारे जि.प. स्तरावर १ संगणक प्रोग्रामर, ४ संगणक आॅपरेटर पं. स. स्तरावर १ संगणक प्रोगामर आणि २ आॅपरेटर व हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या ग्रा.पं. मध्ये प्रत्येकी १ डाटा एन्ट्री आॅपरेटरची नेमणूक केली आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार वरील सर्व पदांना ठरवून दिल्याप्रमाणे मानधन देण्यात येते. परंतु ग्रा. पं. स्तरावर असणाऱ्या डाटा एन्ट्री आॅपरेटर यांना ठरवून दिल्याप्रमाणे ८ हजार मानधन देण्याचा निर्णय आहे. तरीही आतापर्यंत ३५०० ते ४१०० प्रमाणे प्रत्येक आॅपरेटरला मानधन अदा केले जाते. त्यामुळे सदर कंपनी ग्रा.पं. आॅपरेटरचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्यातच आता नव्याने कोणतेही शासन परिपत्रक नसताना कंपनीनुसार महिन्याकाठी ४५० डाटा एन्ट्री करणे सक्तीचे असून ते न केल्यास काहीच मानधन देणार नाही असे जाहीर करून तालुका व जिल्हा समन्वयक यांच्यामार्फत सक्तीचे केले आहे. अनेकांना चार ते पाच महिनापासून मानधन नाही. दर दिवसाची हजेरी युनिटी आय.टी. ह्या सॉफ्टवेअरमध्ये लावली जाते. तरी मानधन मात्र अदा केल्या जात नाही. एकाच शासनाच्या परिपत्रकानुसार सर्वांना मानधन ठरवून दिले असतानाही आर्थिक शोषण होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे वर्धा तालुक्यातील प्रत्येक ग्रा.पं. मधील डाटा एन्ट्री आॅपरेटरच्या वतीने कंपनीमार्फत आमचे आर्थिक व मानसिक शोषण करीत असल्याचा आरोप करीत निषेध व्यक्त केला आहे. तसेच वर्धा तालुका डाटा एन्ट्री आॅपरेटर युनियनमार्फत काम बंद करण्याचाही निर्णय घेतलेला आहे. तसेच कंपनी विरोधात सोमवारी १० नोव्हेंबर रोजी बजाज चौक ते जि. प. वर्धा पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. शिष्टमंडळात बिट्टू रावेकर, तुषार राऊत, निलेश वैरागडे, निखिल कहाथे, विपूल शिंदे, विवेक दुधकोहळे, काळे, धमाने, बावणे, शेंडे, टेकाम आदींचा सहभाग होता.(शहर प्रतिनिधी)