रुग्णालयांत नियमित डॉक्टर नियमबाह्य प्रतिनियुक्तीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 06:00 IST2019-12-20T06:00:00+5:302019-12-20T06:00:17+5:30

येथील ट्रामा केअर युनिट व उप जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची १८ पदे मंजूर आहेत. मात्र, पगारपत्रकात दहाची नोंद असतांना प्रत्यक्षात केवळ ८ डॉक्टर कार्यरत आहेत. १२० खाटांचे रुग्णालय, २४ तास सेवा व जवळपास दररोजची बाह्यरुग्ण तपासणी हजारांच्या दरम्यान आहे. गतवर्षीची या रुग्णालयाची बाह्य रूग्णसंख्या २ लाख ८ हजार ३१, तर आंतररुग्ण संख्या ७८३६ आहे.

Regular doctors in hospitals on non-routine deployment | रुग्णालयांत नियमित डॉक्टर नियमबाह्य प्रतिनियुक्तीवर

रुग्णालयांत नियमित डॉक्टर नियमबाह्य प्रतिनियुक्तीवर

ठळक मुद्देकंत्राटीवर रुग्णांचा भार : निधीची उधळपट्टी थांबविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : आपत्कालीन परिस्थितीत जास्तीत जास्त एक महिना प्रतिनियुक्ती चा कायदा असताना नियम धाब्यावर बसवून येथील उपजिल्हा रुग्णालयातील दोन तज्ज्ञ डॉक्टर व एक कार्यालयीन सहायक अधीक्षक दीर्घ काळापासून प्रतिनियुक्तीवर आहेत. आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर कार्यरत डॉक्टरांना वर्षानुवर्षे प्रतिनियुक्तीवर पाठवून त्यांच्या जागेवर कंत्राटी डॉक्टरांना महिन्याला लाखो रुपये देण्याचा अर्थपूर्ण प्रकार थांबविण्याची गरज नागरिक व्यक्त करीत आहे.
येथील ट्रामा केअर युनिट व उप जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची १८ पदे मंजूर आहेत. मात्र, पगारपत्रकात दहाची नोंद असतांना प्रत्यक्षात केवळ ८ डॉक्टर कार्यरत आहेत. १२० खाटांचे रुग्णालय, २४ तास सेवा व जवळपास दररोजची बाह्यरुग्ण तपासणी हजारांच्या दरम्यान आहे. गतवर्षीची या रुग्णालयाची बाह्य रूग्णसंख्या २ लाख ८ हजार ३१, तर आंतररुग्ण संख्या ७८३६ आहे. सद्यस्थितीत या रुग्णालयात आस्थापनेवरील १० डॉक्टरपैकी एक वैद्यकीय अधीक्षक, चर्मरोगतज्ज्ञ, तीन अस्थिरोगतज्ज्ञ, दोन भूलतज्ज्ञ, एक बालरोगतज्ज्ञ, एक पॅथॉलॉजिस्ट व अन्य दोन डॉक्टर आहेत. यापैकी डॉ. कपूर, भूलतज्ज्ञ चार वर्षांपासून जिल्हा रुग्णालयात तर स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नारलवार सहा महिन्यांपासून पुलगावला प्रतिनियुक्तीवर आहेत. तर कार्यालयीन सहायक अधीक्षक निखारे चार वर्षांपासून उपसंचालक कार्यालयात प्रतिनियुक्तीवर आहेत. मात्र, यांचे वेतन हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयातून होते. बाळंतपणाची मासिक संख्या १२५ वर आहे. परंतु, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नारलवार मात्र पुलगावला, तर भूलतज्ज्ञ डॉ. कपूर वर्ध्याच्या रुग्णालयात निर्धारित दोन भूलतज्ज्ञ कार्यरत असतानासुद्धा भूलतज्ञ डॉ. कपूर यांना प्रतिनियुक्तीवर दिले आहे. त्यांच्या जागी कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सोनोग्राफीतज्ज्ञसुद्धा कंत्राटी पद्धतीने असून या सर्वांना दरमहा प्रत्येकी दोन-तीन लाखांदरम्यान बिल दिले जात आहे. दरमहा लाखो रुपये मिळविणाऱ्या कंत्राटी डॉक्टरांना स्थायी डॉक्टरांसारखी कामे नाहीत. प्रसुती रुग्ण तपासणी, सिजर, भुल देणे, सोनोग्राफी काढणे, यासाठी कामाप्रमाणे बिलाची सोय असल्याने यांत गैर प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शासनाच्या निधीची बचत करून रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

अधिकाऱ्यांवर कारवाईकडे लागले लक्ष
विविध कारणांनी दोन-तीन वर्षांच्या प्रतिनियुक्तीच्या रूढ प्रथेला आळा घालण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने २८ फेब्रुवारी २०११ शासकीय परिपत्रक काढून प्रतिनियुक्तीचा कालावधी व अधिकाºयांचे अधिकार निर्धारित केले आहे. त्या आदेशानुसार जिल्हा शल्य चिकित्सक व उपसंचालक (आरोग्य) यांना आकस्मिक परिस्थितीत वर्ग अ व ब च्या वैद्यकीय अधिकारी व प्रशासकीय तसेच तत्सम अधिकाºयांना सात दिवसांची तर संचालक आरोग्य यांना एखाद्या क्षेत्रात साथरोग, अपघात किंवा अन्य कारणांनी तातडीची किंवा आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास जास्तीत जास्त एक महिन्याची प्रतिनियुक्ती देण्याची तरतूद आहे. तसेच एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात किंवा एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात दिलेली पदस्थापना प्रतिनियुक्ती होत नसल्याचे यात स्पष्ट केले आहे. या आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन करणाऱ्यांवर शिस्तभंग कारवाईची तरतूद केली आहे. वर्ध्याच्या रुग्णालयात निर्धारित भूलतज्ज्ञ कार्यरत आहेत. अशाही स्थितीत येथील अधिकाऱ्यांना चार वर्षांपासूनची प्रतिनियुक्ती कोणत्या कायद्याने व कोणत्या अधिकाऱ्यांनी कोणत्या परिस्थितीमुळे दिली, हा संशोधनाचा विषय आहे. आरोग्य विभागाच्या कायद्याची उघडपणे पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आरोग्य विभाग काय कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

Web Title: Regular doctors in hospitals on non-routine deployment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.