वृक्ष प्राधिकरणबाबत जिल्हा प्रशासन बेपर्वा
By Admin | Updated: April 27, 2016 02:14 IST2016-04-27T02:13:35+5:302016-04-27T02:14:39+5:30
रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या संरक्षणाबाबत वर्धा जिल्हा चांगलाच बेपर्वा असल्याचे दिसून आले आहे.

वृक्ष प्राधिकरणबाबत जिल्हा प्रशासन बेपर्वा
धुऱ्याच्या आगीत झाडांची होरपळ : आठ वर्षांपासून समितीचे पुनर्गठन नाही
पराग मगर वर्धा
रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या संरक्षणाबाबत वर्धा जिल्हा चांगलाच बेपर्वा असल्याचे दिसून आले आहे. या झाडांच्या संरक्षणाकरिता असलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीचे गत आठ वर्षांपासून गठनच झाले नसल्याची माहिती ‘लोकमत’च्या हाती आली आहे. झाडांबाबत प्रशासनाची उदासिनता एवढ्यावरच थांबली नाही तर या समितीबाबत पदसिद्ध अध्यक्ष असलेल्या खुद्द जिल्हाधिकाऱ्यांचे कार्यालयही अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.
रस्त्यालगत असलेल्या झाडांच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या या समितीचे आठ वर्षांपूर्वी म्हणजेच सन २००८ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेत गठन झाले होते. त्यानंतर या समितीचे कधी नूतनीकरणच झाले नाही. परिणामी जिल्ह्यात होत असलेल्या वृक्षतोडीकडे कुणाचे लक्ष नाही. झाडांच्या अस्तित्त्वाबाबत कोणीच गंभीर नाही. यामुळे वर्धेत ‘झाडे लावा झाडे जगवा’ हा संदेश केवळ कागदावरच असल्याचे समोर येत आहे.
वाढत्या तापमानापासून बचावाकरिता सर्वत्र वृक्षारोपणाचा संदेश देण्यात येतो. यावर अंमलबजावणी सुरू आहे, दुसरीकडे शेतकऱ्यांकडून पेटविण्यात येत असलेल्या धुऱ्यांच्या आगीत मोठमोठी झाडे होरपळली जात आहे. याकडे मात्र जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शेताच्या धुऱ्यावर अशी आग लावण्यावर प्रतिबंध घालण्याकरिता या समितीमार्फत काही ठोस नियम आखण्याची गरज आहे; मात्र जिल्ह्यात या समितीचे गठनच झाले नसल्याने जिल्ह्यात वृक्षलागवडीपेक्षा वृक्षतोडच अधिक असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात केवळ वर्धा नगरपरिषदेत मुख्यकार्यपालन अधिकाऱ्यांनी अशी समिती गठीत करण्यात आल्याची माहिती आहे. तीही निसर्ग सेवा समितीच्या पुढाकाराने अस्तित्त्वात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाची उदासीनता प्रत्ययास येते.
धुरा पेटविण्यात अनेक झाडांचा कोळसा
उन्हाळवाही सुरू करताना शेतकरी त्यांच्या शेतात असलेला काडीकचरा पेटवितात. यात धुऱ्यावरील कचरा जाळण्याचीही पद्धत आहे. धुऱ्यावर लावण्यात आलेल्या आगीत अनेक मोठी वृक्ष जाळली जातात. यातील काही वृक्ष मुळातून पूर्णत: जळाली असून ती रस्त्यावर आडवी झाली आहेत. दोन दिवसांपूर्वी वर्धा-नागपूर मार्गावर सेलू नजीक धुरा पेटविल्याने बुंध्यापासून जळालेले बाभळीचे झाड महामार्गावरच कोसळले. त्यामुळे बराच वेळ वाहतूक विस्कळीत झाली. भर दुपारी हे झाड पडले. नेमक्या वेळी रस्त्यावर कुणी नसल्याने मोठा अपघात टळला. तसेच शुक्रवारी रात्री वर्धा पवनार मार्गावर एका शेतकऱ्याने धुरा पेटविल्याने संपूर्ण आग रस्त्यापर्यंत पोहोचली. धुरा पेटविताना पसरत गेलेल्या आगीतून अनेक ठिकाणी आगी लागल्याच्या घटना घडल्या आहेत.
रस्त्याच्या कडेला बाभूळ, आंबा आणि कडुलिंब अशी झाडे आढळतात. यातील आंबा आणि बाभूळ ही झाडे लवकरच पेट घेणारी आहेत. त्यातच आंब्याचे झाडे हे आतून पोकळ असते. त्यामुळे ही दोन्ही झाडे पेटायला हलकीशी आसही पुरते. शेतकऱ्यांनी हा प्रकार टाळावा याकरिता व्यापक जनजागृती करण्याची गरज व्यक्त आहे.