चाऱ्याच्या अभावामुळे दूध उत्पादनात घट
By Admin | Updated: February 8, 2016 02:22 IST2016-02-08T02:22:33+5:302016-02-08T02:22:33+5:30
उन्हाळ्याची चाहूल लागली असून पारा दिवसेंदिवस वाढत आहे. यातच चाऱ्याचा अभाव, पाणीटंचाई व भारनियमनाचा फटका बसत असल्याने दूध उत्पादनात घट येत असल्याचे दिसते.

चाऱ्याच्या अभावामुळे दूध उत्पादनात घट
चाहुल उन्हाळ्याची : भारनियमनाचाही बसतोय फटका
झडसी : उन्हाळ्याची चाहूल लागली असून पारा दिवसेंदिवस वाढत आहे. यातच चाऱ्याचा अभाव, पाणीटंचाई व भारनियमनाचा फटका बसत असल्याने दूध उत्पादनात घट येत असल्याचे दिसते. यामुळे गोपालक व दुग्ध उत्पादक शेतकरी चिंतीत आहेत.
सेलू येथील दोन दुग्ध संस्थांनी झडसी व सभोवतालच्या परिसरात डेअरी सुरू केल्या. त्यांच्यामार्फत हजारो लिटर दूध गोळा केले जाते. शासनापेक्षा या संस्थेद्वारे शेतकऱ्यांना अधिक भाव दिला जातो. यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले. झडसी व सभोवतलाच्या परिसरातून हजारो लिटर दूध या संस्थेला पुरविले जाते; पण उन्हाचा पारा व वाढत्या पाणीटंचाईमुळे दुधाचे उत्पादन घटले. भारनियमनाचा फटका बसत असल्याने गोपालक संकटात आलेत. नैसर्गिक संकट व नापिकीमुळे शेती व्यवसाय परवडत नाही. यामुळे शेतीला पुरक म्हणून जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय सुरू झाला; पण चाऱ्याची समस्या भेडसावत आहे. यामुळे दुग्ध व्यवसाय अडचणीत आला असून शेतकरी दुभत्या जनावरांची कमी दरात विक्री सुरू असल्याचे दिसून येते.
शेतीला जोडधंदा असलेल्या दुग्ध व्यवसायासाठी शेतकरी संकरीत गाई, म्हशी आदी पशुपालन करतात; पण यंदा चारा मिळणे दुरापास्त झाल्याने शेतकऱ्यांना जनावरे जगवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. गोपालकांना चाऱ्याची सोय करून देणे गरजेचे आहे.(वार्ताहर)