मोबदल्यासाठी शेतकऱ्यांकडून वसुली
By Admin | Updated: March 4, 2016 02:16 IST2016-03-04T02:16:54+5:302016-03-04T02:16:54+5:30
धनोडी (बहाद्दपूर) येथील निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा शिवारातून गेला आहे. कालव्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या.

मोबदल्यासाठी शेतकऱ्यांकडून वसुली
निम्न वर्धा कालवे विभागाचा प्रताप : जमिनी देऊनही होतेय शेतकऱ्यांची गळचेपी
विजयगोपाल : धनोडी (बहाद्दपूर) येथील निम्न वर्धा प्रकल्पाचा कालवा शिवारातून गेला आहे. कालव्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्या. आता मोबदला दिला जात आहे; पण यातही कालवे विभागाचा अभियंता वसुली करीत असल्याने शेतकऱ्यांची गळचेपी होत आहे. याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
निम्न वर्धाच्या विजयगोपाल, हिवरा, तांबा, चोंडी या शिवारातील कालव्यात शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. या जमिनीचा मोबदला शासनाकडून सध्या दिला जात आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी कनिष्ठ अभियंता सालनकार व सहायक चारभे यांच्यावर शेतकऱ्यांकडून कागदपत्रे गोळा करण्याची जबाबदारी सोपविली आहे. या दोघांनी शेतकऱ्यांच्या घरी वा ग्रा.पं. मध्ये जाऊन त्यांची कागदपत्रे गोळा केली. शेतकऱ्यांचे संपर्क क्रमांक घेतले. त्यांना पुलगाव येथील नोंदणी कार्यालयात बोलवून खरेदी करून धनादेशाचे वाटप केले. धनादेश पास होताच प्रत्येक शेतकऱ्याला तुमचे चेक काढून दिले, मोबदला अधिक मिळवून दिला, तुमचे काम इतक्या लवकर होणार नव्हते, अशा भुलथापा देत ५ ते २५ हजार रुपयांपर्यंत मागणी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. काही शेतकरी या भुलथापांना बळी पडले व रक्कम दिली. काही महिला व शेतकऱ्यांनी ओरड करताच त्यांच्या भ्रमणध्वनीवर कॉल करून तुमचे पैसे कसे निघतात हे बघून घेतो, असे म्हणत अरेरावी केली. याबाबत शेतकऱ्यांनी निम्न वर्धा प्रकल्प कार्यालयातही तक्रार केली आहे. सदर अधिकाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.(वार्ताहर)