५० ऐवजी २०५ रुपयांची वसुली
By Admin | Updated: November 22, 2015 02:16 IST2015-11-22T02:16:30+5:302015-11-22T02:16:30+5:30
शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम म्हणून येथील न.प. माध्यमिक शाळेच्या प्रांगणात ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र बनविण्याचे काम सुरू आहे.

५० ऐवजी २०५ रुपयांची वसुली
देवळीत ओळखपत्राच्या नावावर ज्येष्ठांची लूट
हरिदास ढोक देवळी
शासनाच्या सामाजिक न्याय विभागाचा उपक्रम म्हणून येथील न.प. माध्यमिक शाळेच्या प्रांगणात ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र बनविण्याचे काम सुरू आहे. डिग्नीटी फाऊंडेशन मुुंबई या खासगी संस्थेकडे ही ओळखपत्रे बनविण्याचे काम देण्यात आले आहे. ही संस्था या कामाकरिता ज्येष्ठांकडून अधिकचे पैसे उकळत त्यांच्याकडून ५० ऐवजी २०५ रुपये घेत आहेत.
याबाबतची तक्रार तहसीलदार तेजस्विनी जाधव यांच्याकडे करण्यात आली आहे. संबंधीत ज्येष्ठांकडून घेतलेले जास्तीचे पैसे त्यांना परत करण्यात यावे, अशी मागणी प्रवीण फटींग यांनी तहसीलदारांकडे केली आहे. शासनाच्या वेगवेळ्या योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी समाजातील ज्येष्ठ नागरिकांची ओळखपत्रे बनविण्याचे काम जोरात सुरू आहे. डिग्नीटी फाऊंडेशन मुंबई या खासगी संस्थेला हे काम देण्यात आले आहे. संबंधीत ज्येष्ठांकडून फक्त ५० रुपये शुल्क घेण्याचे शासनाने निर्देश आहेत. ही संस्था संबंधितांकडून सभासद शुल्क म्हणून १५० रुपये ज्येष्ठ नागरिक कार्ड ५० व कोड शुल्क म्हधून ५ रुपये असे एकूण २०५ रुपये घेत असल्याचे समोर आले आहे.
काहींनी याची तक्रार संस्थेचे वर्धा येथील कार्यालयीन प्रमुख बाबाराव खन्ते यांच्याकडे केली. तिथे सर्वच ठिकाणी अशाच पद्धतीचे शुल्क घेवून काम सुरू असल्याचे सांगण्यात आले. सुरू कामात अडथळा आणल्यास तुमच्या येथील कार्ड बनविण्याचे काम बंद करण्यात येईल, असा तक्रारकर्त्यांना देण्यात आल्याचा आरोप आहे. सर्व ज्येष्ठांना एकाचवेळी ओळखपत्रे देता यावी म्हणून शासनाने हा उपक्रम राबवून खासगी संस्थेकडे हे काम सोपविले; परंतु ही संस्था शासनाच्या नियमांना चूना लावून समाजातील गरीब ज्येष्ठांची लुबाडणूक करीत आहेत. या माध्यमातून लाखोंचा मलिदा घश्यात उतरविला जात असल्याचा आरोप आहे.