आर्वी मार्गावरील गतिरोधकाला परिवहन प्राधिकरणाची मान्यता
By Admin | Updated: February 23, 2017 00:52 IST2017-02-23T00:52:34+5:302017-02-23T00:52:34+5:30
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणच्या सभेमध्ये आर्वी-वर्धा मार्गावरील पिपरी तंत्रनिकेतन येथे गतिरोधक बसविण्याबाबत निर्णय घेण्यात आला.

आर्वी मार्गावरील गतिरोधकाला परिवहन प्राधिकरणाची मान्यता
रामदास तडस यांची माहिती : बांधकाम विभागाला आदेश निर्गमित
वर्धा : प्रादेशिक परिवहन प्राधिकरणच्या सभेमध्ये आर्वी-वर्धा मार्गावरील पिपरी तंत्रनिकेतन येथे गतिरोधक बसविण्याबाबत निर्णय घेण्यात आला. त्यामुळे विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे. याबाबत खासदार रामदास तडस यांनी संबंधीत विभागाल पत्र दिले होते. यानुसार ही मागणी मान्य करण्यात आली.
गतिरोधक देण्याचा विषय या सभेत प्रामुख्याने मांडण्यात आला. या मार्गावर वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ आहे. या मार्गावर विविध महाविद्यालयातून ३-४ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. अनेकदा विद्यार्थ्यांना वाहनांची धडक बसून अपघात होतो. याकरिता दौलतसिंग विद्यालय, ग्रामविकास तंत्रनिकेतन पिपरी, उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिपरी, रामकृष्ण बजाज कृषी विद्यालय, रूरल इन्स्टिट्युट समोर शाळा असल्याबाबतचा निर्देष फलक आणि गतिरोधक बसविण्याबाबत प्रादेशिक परिवहन यांनी मान्यता प्रदान केली. येथे गतिरोधक बसविण्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला आदेश देण्यात आला आहे. येथे गतिरोधक असल्याचा फलक लावण्यात यावा, असे नमुद केले आहे.
आचार्य तंत्रनिकेतन येथील मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले. खासदार रामदास तडस यांना निवेदनाची प्रत देण्यात आली. त्यामुळे येथील समस्या सभेमध्ये चर्चेकरिता ठेवण्यात आली.
यापूर्वी खासदार तडस यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला शैक्षणिक संस्था व विद्यार्थी वर्गाच्या मागणीच्या आधारे पत्र देवून गतिरोधक देण्याच्या सूचना केल्या. परंतु गतिरोधक बसविण्याकरिता परिवहन प्राधिकरणाची मान्यता आवश्यक असल्याने हा विषय प्राधिकरणाचे अध्यक्ष यांच्यासमोर ठेवण्यात आला. या विषयाला सभेत मान्यता प्रदान करण्यात आली. या मान्यतेमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.(स्थानिक प्रतिनिधी)