रस्त्यावरील चुरी अपघातास कारण
By Admin | Updated: January 10, 2016 02:38 IST2016-01-10T02:38:19+5:302016-01-10T02:38:19+5:30
शहरात रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्याच्या नावाखाली सर्वत्र चुरी टाकण्यात आली.

रस्त्यावरील चुरी अपघातास कारण
दुरुस्तीचे काम निकृष्ट : प्रवासी व्यक्त करतात संताप
वर्धा : शहरात रस्त्याची तात्पुरती डागडुजी करण्याच्या नावाखाली सर्वत्र चुरी टाकण्यात आली. या चुरीमुळे वाहने घसरून किरकोळ अपघाताच्या घटना नित्याच्याच झाल्या आहे. त्यामुळे दुरुस्तीसाठी टाकलेली रस्त्यावरील चुरीच अपघातास कारण ठरत असल्याचे नागरिकांत बोलल्या जात आहे.
शहरातील अंतर्गत जोडरस्त्यांची दैना झाली आहे. काही रस्ते सिमेंटचे तर काही रस्ते डिंबरीकरण केलेले आहेत. या दोन रस्त्यांच्या जोडत असलेले पॅचेस नेहमी खराब होत असतात. त्यावरील गिट्टी उखडून रस्ते खडबडीत होत असतात. या रस्त्याची कायम डागडुजी करणे गरजेचे असते. पण तसे न करता केवळ कोरडी चुरी टाकून रस्त्याची दुरुस्ती करण्याचा फार्स निर्माण केला जात आहे. विशेष म्हणजे रस्ता जोडत असलेल्या पॅचेसवर सतत वाहने वळती होत असतात. वळण घेतानाच दुचाकी वाहने या चुरीमुळे घसरून अपघात वाढले आहे.
या काही वर्षात शहरातील वाहनांची संख्या वाढली आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत शहरात वाहने धावत असतात. यातच काही सुसाट वेगाने दुचाकी दामटविणारेही कमी नाहीत. त्यांच्यामुळेही अपघातांमध्ये वाढ झाली आहे. मध्यंतरी शहरातील अनेक डांबरीरस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले. त्याच वेळी उखडलेल्या सिमेंट रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले. यामुळे रस्त्याची कामे कुठल्या दर्जाची होत आहे याचा प्रत्यय सर्वांनाच येत आहे. पालिका प्रशासनाने या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष देत अश्या प्रकारे चुरी टाकून केली जात असलेली तात्पुरती डागडुजी बंद करावी, अशी मागणी होत आहे.(शहर प्रतिनिधी)
वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले
शहरातील अनेक रस्ते हे पक्के डांबरीकरण असलेले तर काही रस्ते नव्याने सिमेंटचे बांधण्यात आले आहे. सदर रस्ते एकमेकांना जोडताना तयार झालेले पॅचेस अतिशय निकृष्ट दर्जाचे बनविण्यात आले आहे. यात डांबर कुठेही आढळत नाही. त्यातच या पॅचेसवर चुरी टाकून उखडलेले खड्डे व गोटे बुजविण्याचा प्रकार सुरू आहे. विशेष म्हणजे याच जागेवरून वाहने वळणे घेत असतात. त्यामुळे वाहने वळताना चुरीमुळे ती घसरून अपघात होत आहेत. ही बाब लक्षात घेता या रस्त्यांची चांगल्या प्रकारे दुरुस्ती करणे गरजेचे झाले आहे.
सुसाट बाईकर्समुळेही अपघात
मोठ्याने आवाज करीत असलेल्या बाईक ऐन गर्दीत सुसाट वेगाने दामटवित असणारे बाईकर्स शहरात आता कमी नाही. दिवसेंदिवस यांची संख्या वाढतच चालली आहे. नागरिक जरी आपली वाहने व्यवस्थित चालवित असले तरी अनेकदा अश्या सुसाट बाईकार्समुळे अपघात बळावले आहे. अनेकदा अश्या वाहनचालकांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. चार्ली पथकाद्वारे अनेकांना चोपही मिळाला आहे. असे असतानाही हा प्रकार कमी होताना दिसत नाही. त्यातच भसाड्या आवाजातील हॉर्नही मानस्ताप देणारे असतात.
पक्की डागडुजी करण्याची मागणी
मध्यंतरी शहरातील अनेक डांबरीरस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात आले. त्याच वेळी उखडलेल्या सिमेंट रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले. यामुळे रस्त्याची कामे कुठल्या दर्जाची होत आहे याचा प्रत्यय सर्वांनाच येत आहे. त्यामुळे चुरी न पसरविता पक्की दागडुजी करण्याची मागणी होत आहे.
रस्ता दुरुस्तीचा फार्स
दुरुस्तीच्या नावावे चुरी टाकून केवळ रस्ता दुरुस्तीचा फार्स निर्माण केला जात असल्याची ओरडही प्रवासी वर्गातून होत आहे. तसेच रस्त्याची योग्य दुरुस्ती करण्याची मागणीही केली जात आहे.