लव्हाळे, बेशरमच्या विळख्याने नदी पात्र धोक्यात
By Admin | Updated: March 16, 2017 00:45 IST2017-03-16T00:45:27+5:302017-03-16T00:45:27+5:30
भूजल पुनर्भरण तथा सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात.

लव्हाळे, बेशरमच्या विळख्याने नदी पात्र धोक्यात
खोलीकरणाची मागणी : नदीचे पाणी दूषित
वर्धा : भूजल पुनर्भरण तथा सिंचन क्षमतेत वाढ करण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात. जलयुक्त शिवार योजनेवर खर्च केला जातो; पण मुख्य जलस्त्रोत असलेल्या नद्यांकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी, जिल्ह्यातील बहुतांश नद्यांचे पात्रच धोक्यात आल्याची स्थिती आहे. काही नद्यांची अतिरेकी रेती उपसा वाट लावत आहे तर काही नद्या लव्हाळे, बेशरम व वनस्पती वाढल्याने नाल्यात परिवर्तित होत असल्याचे दिसते. ही बाब गांभीर्याने घेणेच गरजेचे झाले आहे.
वर्धा जिल्ह्यात वर्धा, वणा, यशोदा, बोर, धाम, बाकळी आदी नद्या वाहतात. या नद्यांचे जलस्त्रोत जिवंत ठेवण्यासाठी शासनाकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे; पण तसे होताना दिसत नाही. जिल्ह्यातील बहुतांश नद्यांना जलपर्णीचा विळखा असल्याचे दिसते. परिणामी, नद्यांच्या पात्रांचे नाल्यात रूपांतर होत असल्याचे दिसते. नदीच्या पात्रामध्ये लव्हाळे वाढले असून बेशरमची झाडे वाढली आहेत. शिवाय विविध वनस्पती वाढल्याने पाण्याचा प्रवाह अवरुद्ध होत आहे. पाणी थांबल्याने ते बेशरम व वनस्पतीमुळे दूषित होऊन अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करीत आहे. प्रारंभी शासनाने नदी स्वच्छता अभियान हाती घेतले जाणार असल्याची घोषणा केली. धाम नदीच्या स्वच्छतेसाठी कार्यक्रमांचा घाटही घातला; पण हा प्रकार तेवढ्यावरच थांबला. यानंतर कुठेही नद्या स्वच्छ करण्यात आल्या नाही. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)