वर्धा : विदेशात इंडोनेशिया, म्यानमार, थायलंड आणि भारतात आसाम, त्रिपुरा व अंदमान निकोबार बेटावर असणारा अनेक व्याधींवर गुणकारी असा फेरनंदोआ ओडेनोफिला (कट सांग) नावाचा दुर्लभ वृक्ष महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्व विद्यालयात आढळून आला. वर्धेतील वनस्पती तज्ज्ञ ‘फ्लोरा ऑफ वर्धा’ या ग्रंथाचे लेखक प्रो. रमेश आचार्य आणि वन्यजीव प्रतिपालक कौशल मिश्र यांनी या वृक्षाला शोधून काढले. या झाडाच्या लाकडापासून गोल्फ आणि बिलियर्ड खेळासाठी वापरण्यात येणारी स्टिक बनविली जाते. २००३-०४ मध्ये विश्वविद्यालयात वृक्षारोपण झाले त्यावेळी इतर रोपट्यांसोबत या झाडाचे रोपटे आले. आता हे झाड पूर्णपणे विकसित झाले असून त्याला एक फूट लांब शेंगाही लागल्या आहेत. त्यात चमकणारे बीज दिसून आले. नुकतेच प्रो. रमेश आचार्य, कौशल मिश्र, जनसंपर्क अधिकारी बी. एस. मिरगे आणि विजय राठी यांनी या झाडाचे निरीक्षण केले. त्याचे बी खरांगना येथील रोपवाटिकेत पाठविले आहेत. हे झाड दिसून येणे ही एक उपलब्धी असल्याचे मत आचार्य यांनी व्यक्त केले. सेवानिवृत्त प्रो. आचार्य यांना झाडांची ओळख पटवून त्यांचे वर्गीकरण करण्यात महारत प्राप्त आहे.
हिंदी विश्वविद्यालयात आढळले दुर्लभ वृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 05:00 IST