धनोडी बहाद्दरपुरात आढळले दुर्मीळ झेंडूचे फूल
By Admin | Updated: January 24, 2015 01:40 IST2015-01-24T01:40:35+5:302015-01-24T01:40:35+5:30
झेंडू हे संपूर्ण देशात महत्त्वाचे फुलपीक. झेंडूची फुलांमध्ये आफ्रिकन झेंडू, फ्रेंच झेंडू , क्रॅकर जॅक, गोल्डन जुबली, गोल्डन यलो जरसन जायंट, एम.डी.यू. आदी जाती प्रचलित आहे.

धनोडी बहाद्दरपुरात आढळले दुर्मीळ झेंडूचे फूल
फनिंद्र रघाटाटे रोहणा
झेंडू हे संपूर्ण देशात महत्त्वाचे फुलपीक. झेंडूची फुलांमध्ये आफ्रिकन झेंडू, फ्रेंच झेंडू , क्रॅकर जॅक, गोल्डन जुबली, गोल्डन यलो जरसन जायंट, एम.डी.यू. आदी जाती प्रचलित आहे. या सर्व फुलांचे आयुष्य किमान दोन ते तीन दिवसांचे. वर्धा जिल्ह्यातील धनोडी बहाद्दरपूर येथे फुल तोडल्यानंतरही १५ दिवस टवटवित राहणारा दुर्मीळ झेंडू आढळला आहे.
आपल्या परसबागेत श्याम गायकवाड यांनी ही लागवड केली आहे. सृष्टीवरील प्रत्येक सजीवाला मर्यादेपर्यंत आयुष्य असते. झाडे आणि फुलेही त्यातून सुटली नाहीत. झाडांचे आयुष्यमान शेकडो वर्षांचे असले तरी, झाडांना येणाऱ्या फुलांचे आयुष्यमान अतिशय अल्प असते. त्यातच फुले ही श्रद्धेय असल्याने मानव श्रद्धेपोटी फुलांना तोडून फुलांना मिळालेले आयुष्यही हिरावतो. साधारणत: तोडलेली फुले ही एका दिवसातच कोमेजून जातात. व्यवसायिक फुले तोडल्यानंतर किमान दोन दिवस ताजे राहतात. गायकवाड यांनी लागवड केलेल्या झेंडूचे फुल तोडल्यानंतरही १५ दिवस टवटवित राहत असल्याने, व्यापारी आणि शेतकऱ्यांसाठी खरोखरच आनंददायी वार्ता आहे. फिक्या पिवळ्या रंगाचे हे फुल आहे. एका झाडाला जवळपास ५० ते ६० फुले येतात. गत तीन वर्षांपासून त्यांच्या परसबागेत या झेंडूच्या फुलांचे दोन झाडं आहेत. या दुर्मीळ फुलांची माहिती परिसरातील फुलशेती करणारे शेतकरी व्यापारी यांना मिळाल्याने कुतूहल व आकर्षणापोटी माहिती घेण्यासाठी त्यांच्याकडे नियमित येत आहे.
प्रसादात आलेल्या फुलाच्या बीजापासून झाड
श्याम गायकवाड आष्टा येथील भिकाजी महाराजांच्या आश्रमात दर्शनाला गेले होते. त्यावेळी त्यांना प्रसादाच्या स्वरुपात हे फुल मिळाले. या फुलांचे बीज त्यांनी संग्रही करून ठेवले, त्यानंतर मृग नक्षत्रात त्याची लागवड घराच्या परसबागेत केली. त्याला शेणखत दिले. संगोपण केले. मार्गशिष महिन्यात त्याला फुले आली. कृषी तज्ज्ञ व अभ्यासकांनी या झाडांची पाहणी केल्यानंतर या झाडांना मिळालेल्या वातावरणानुसार हा काश्मिरी झेंडू असल्याचा तर्क त्यांनी लावला आहे. शेतकऱ्यांना लाभदायी ठरणारा हा झेंडू भिकाजी महाराजांनी प्रसाद रुपात दिल्यामुळे याची शेती करण्याचा निर्णय श्याम गायकवाड यांनी घेतला आहे.