बलात्कारी सावत्र पित्यास दुहेरी जन्मठेप
By Admin | Updated: May 9, 2015 01:59 IST2015-05-09T01:59:25+5:302015-05-09T01:59:25+5:30
मुलीचे सतत लैगिक शोषण करणाऱ्या सावत्र बापास दोन विविध कलमान्वये दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली.

बलात्कारी सावत्र पित्यास दुहेरी जन्मठेप
वर्धा : मुलीचे सतत लैगिक शोषण करणाऱ्या सावत्र बापास दोन विविध कलमान्वये दुहेरी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. सदर निकाल येथील जिल्हा न्यायाधीश समीर अडकर यांनी शुक्रवारी दिला.
या बाबत थोडक्यात वृत्त असे की, प्रकरणातील १४ वर्षीय पीडित मुलगी ही मुळची मुंबई येथील असून ती तिच्या आई व सावत्र पित्यासह सन २०११ मध्ये वर्धेनजीकच्या इंझापूर येथे आली. याच काळात तिच्यावर सावत्र बापाने बलात्कार केला. कालांतराने हे नित्याचेचे झाले. दरम्यान ती शाळेत असताना शिक्षिका वर्गामध्ये ‘आई’ ही कविता शिकवित असताना तिला रडणे अनावर झाले व ती वर्गातच रडायला लागली. शिक्षकेने विश्वासात घेवून विचारपूस केली असता तिने झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. हा प्रकार तिने तिच्या आईला सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु ती ऐकत नव्हती. यामुळे तिच्या वर्ग शिक्षिकेनी मुंबईला पीडित मुलीच्या आजीस फोन करून वर्धेला बोलावले. आजी सोबत तिचा मामाही आला. या दोघांच्या मदतीने तिने सेवाग्राम पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून तिच्या सावत्र पित्यावर भादंविच्या कलम ३७६,५०६ तसेच कलम ४, ६, ७, ८ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. घटनेचा तपास महिला पोलीस निरीक्षक व्ही.एम. तोटेवार यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
सरकारी वकील अनुराधा सबाने यांनी घटना सिध्द करण्यासाठी एकूण आठ साक्षदार तपासले व युक्तीवाद केला. यावरून आरोपीला कलम ३७६ अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच १ हजार रुपये दंड, कलम ५०६ अंतर्गत दोन वर्षांचा सश्रम कारावास तसेच १ हजार रुपये दंड, कलम ६ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायदा २०१२ अंतर्गत आजिवन कारावास व १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. ए.एस.आय काळे यांनी साक्षदारांना न्यायालयात हजर ठेवण्याची कामगिरी बजावली. (प्रतिनिधी)
मारहाणप्रकरणी दोन वर्षे सश्रम कारावास
पाणी पुरवठ्याच्या कामावर असलेल्या सुधाकर नेहारे याला मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी रविंद्र वरठी रा. दहेगाव (गोंडी) याला दोन वर्षे सश्रम कारवासाची शिक्षा ठोठावली. सदर निकाल जिल्हा न्यायाधीश अनिरुध्द चांदेकर यांनी दिला.
सुधाकर नेहारे (४३) रा. दहेगाव (गोंडी) हे पाणी पुरवठा विभागामध्ये नोकरीवर असताना २५ जून २०१२ रोजी नळ सोडण्यास गेले असता रविंद्र याने त्याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. या घटनेची तक्रार मिना सुधाकर नेहारे हिने खरांगणा पोलिसात केली. तक्रारीवरून रविंद्र वरठीवर भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला. तपासपाअंती ठाणेदार दत्तात्रय बोरीगिडे यांनी न्यायालयात आरोपी विरूध्द दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील अनुराधा सबाने यांनी घटना सिध्द करण्यासाठी एकूण १४ साक्षदार तपासले व युक्तीवाद केला. यावरुन न्यायाधीशांनी निकाल दिला. जमादार प्रवीण भोयर यांनी साक्षदारांना न्यायालयात हजर ठेवण्याची कामगिरी बजावली.