कोविड-१९ ची ‘रॅपिड प्रोग्रेशन स्टेज’ धोक्याची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 05:00 IST2020-10-04T05:00:00+5:302020-10-04T05:00:22+5:30
कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने तसेच विविध प्रकारचे दुखणे अंगावर काढल्याने रुग्ण कोरोनाच्या वेगवान प्रगतीच्या टप्प्यात पोहोचण्यास कारणीभूत ठरतो. कोरोना संक्रमणाच्या याच पायरीला ‘रॅपिड प्रोग्रेशन स्टेज’ म्हटले जाते. या स्टेजवर पोहोचलेले काही रुग्ण सध्या जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात उपचारही घेत आहेत. शिवाय त्यांना वेळीच तंदुरूस्त करण्यासाठी कोविड रुग्णालयातील डॉक्टरही प्रयत्न करीत आहेत.

कोविड-१९ ची ‘रॅपिड प्रोग्रेशन स्टेज’ धोक्याची
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : दिवसेंदिवस कोविड बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. इतकेच नव्हे तर कोरोना संसर्गाबाबत अनेक गैरसमज अजूनही नागरिकांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळे अनेक व्यक्ती लक्षणे असतानाही दुखणे अंगावर काढत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. कोविडची ‘रॅपिड प्रोग्रेस स्टेज’ कोरोना बाधित रुग्णांसाठी धोक्याची ठरू पाहत असल्याने नागरिकांनीही सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असल्यास वेळीच नजीकच्या शासकीय रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्यावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
कोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने तसेच विविध प्रकारचे दुखणे अंगावर काढल्याने रुग्ण कोरोनाच्या वेगवान प्रगतीच्या टप्प्यात पोहोचण्यास कारणीभूत ठरतो. कोरोना संक्रमणाच्या याच पायरीला ‘रॅपिड प्रोग्रेशन स्टेज’ म्हटले जाते. या स्टेजवर पोहोचलेले काही रुग्ण सध्या जिल्ह्यातील कोविड रुग्णालयात उपचारही घेत आहेत. शिवाय त्यांना वेळीच तंदुरूस्त करण्यासाठी कोविड रुग्णालयातील डॉक्टरही प्रयत्न करीत आहेत. असे असले तरी या स्टेजवर रुग्ण गेल्यावर कोविडनंतरच्या सहविकृती आणि बाधितांचा मृत्यू रोखण्याचे मोठे आव्हाण वैद्यकीय तज्ज्ञांसमोर उभे राहते.
त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी सर्दी, ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे असा कुठलाही प्रकार नागरिकांनी अंगावर काढू नये. तसेच लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने कोविड चाचणी करून घेत औषधोपचार घ्यावा, असे सांगण्यात आले.
ऑक्सिजनचे प्रमाण असते ८८ पेक्षा कमी
बाधित रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण ८८ पेक्षा कमी असते तेव्हा कोरोनाची रॅपिड प्रोग्रेशन स्टेज असल्याचे म्हणता येत असून रुग्णांनी लक्षणे असताना तीन ते सात दिवस दुखणे अंगावर काढल्याने त्यांच्या फुफ्फुसातील संसर्ग अधिक वाढलेला असतो. त्यामुळे लक्षणे आढळल्यास त्याला लपवून न ठेवता रुग्णाने वेळीच नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावून उपचार घेतले पाहिजे.