लाचखोर पटवाऱ्याला सश्रम कारावास

By Admin | Updated: December 31, 2015 02:18 IST2015-12-31T02:18:59+5:302015-12-31T02:18:59+5:30

गाव नमूना आठ अ देण्याकरिता १०० रुपयांची लाच मागणाऱ्या पटवाऱ्यास सश्रम कारावासाची शिक्षा सुणावण्यात आली.

Rape victim's rigorous imprisonment | लाचखोर पटवाऱ्याला सश्रम कारावास

लाचखोर पटवाऱ्याला सश्रम कारावास

पाच हजार रुपये दंड : १०० रुपयांची मागितली होती लाच
वर्धा : गाव नमूना आठ अ देण्याकरिता १०० रुपयांची लाच मागणाऱ्या पटवाऱ्यास सश्रम कारावासाची शिक्षा सुणावण्यात आली. हा निर्वाळा सत्र न्यायाधीश संध्या रायकर यांनी बुधवारी दिला.
देवळी तालुक्यातील गिरोली येथे राजू तानबाजी मून हे पटवारी म्हणून २००७ मध्ये कार्यरत होते. शेतकरी देविदास चौधरी रा. पाथरी यांनी गाव नमुना आठ-अ मिळावा म्हणून अर्ज सादर केला होता. गाव नमुना आठ अ देण्याकरिता पटवारी मून यांनी १०० रुपयांची लाच मागितली होती. याबाबत चौधरी यांनी ९ जून २००६ रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वर्धा कार्यालयाकडे तक्रार केली. तक्रारीवरून तत्कालीन पोलीस उपअधीक्षक शंकर सिटीकर यांनी गिरोली येथील पटवारी कार्यालयात सापळा रचला. यात १०० रुपयांची लाच स्वीकारताना पटवाऱ्यास रंगेहात अटक करण्यात आली. संपूर्ण चौकशीअंती प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. प्रकरण न्यायपटलावर आल्यानंतर शासनातर्फे सहायक शासकीय अभियोक्ता अ‍ॅड. श्याम दुबे यांनी एकूण सात साक्षदारांच्या साक्षी नोंदविल्या.
दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर सत्र न्यायाधीश संध्या रायकर यांनी आरोपी राजू तानबाजी मून (४३) रा. सावंगी (मेघे) वर्धा यांना दोषी धरून लाच लुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ अन्वये एक वर्षे कारावास व २,५०० रुपये दंड तसेच कलम १३ (२) अन्वये एक वर्षे सश्रम कारावास व २,५०० रुपये दंड तसेच दंड न भरल्यास पुढे तीन महिन्याच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यात शासनातर्फे अ‍ॅड. श्याम दुबे यांनी काम पाहिले. त्यांना अ‍ॅड. रूची तिवारी (दुबे), अ‍ॅड. प्रणाली आगलावे व पोलीस हवालदार संजय डगवार यांनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Rape victim's rigorous imprisonment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.