सार्वजनिक बांधकाम विभागात रंगली ओली पार्टी
By Admin | Updated: April 30, 2015 02:01 IST2015-04-30T02:01:05+5:302015-04-30T02:01:05+5:30
येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा कार्यालयात कार्यरत अभियंता हा बसस्थानकावर रात्री ९ वाजता

सार्वजनिक बांधकाम विभागात रंगली ओली पार्टी
तळेगाव (श्या.पंत) : येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा कार्यालयात कार्यरत अभियंता हा बसस्थानकावर रात्री ९ वाजता मद्यधुंद अवस्थेत बेशुद्ध पडून असल्याचे शुक्रवारी प्रवासी व नागरिकांना आढळून आले. प्रवाश्यांनी त्यांना हटकले असता ते वर्धेकडे निघून गेले. त्यामुळे येथे नेहमीच दारूच्या ओल्या पार्ट्या रंगत असल्याचे बोलल्या जात आहे.
प्राप्त माहितीनुसार, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा कार्यालयात येथील अभियंत्यांना शुक्रवारी मार्च एंडिंगच्या नावाखाली एका ठेकेदाराने ओली पार्टी दिली. यामध्ये एका शाखा अभियंत्याने यथेच्छ मद्यप्राशन केले आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून धुंदीतच ते बसस्थानकावर आले व तेथेच बेशुद्ध झाले. नागरिकांनी हटकले असता ते निघून गेले. पण हा प्रकार येथे नित्याचाच झाला असल्याचे नागरिक सांगतात. बांधकाम विभागात कोट्यवधींची कामे सुरू असून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. ठेकेदाराकडून वारेमाप कमिशन उकळल्या जात असल्याने कामेही निकृष्ठ दर्जाची होते आहेत. बांधकाम विभागाचे विश्रामगृह विविध समस्यांनी ग्रस्त आहे. अधिकारी मुख्यालयी राहत नाही. शाखा अभियंता हरीश परमार हे वर्ध्यावरून तर उपअभियंता नरेश लभाणे हे नागपूरवरून ये-जा करतात. कार्यालय परिसरात दारूच्या बाटल्या नेहमीच आढळतात. महिनाभरात १४ दिवस ओली पार्टी झाल्याचे एका कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.(वार्ताहर)