महिला मंडळाचा तहसील कार्यालयावर मोर्चा
By Admin | Updated: April 2, 2017 00:55 IST2017-04-02T00:55:26+5:302017-04-02T00:55:26+5:30
येथील पोलीस ठाण्यांतर्गत कामठी (अंतरगाव) येथील दारूविक्रेत्याने महिला मंडळाच्या अध्यक्ष

महिला मंडळाचा तहसील कार्यालयावर मोर्चा
सेलू : येथील पोलीस ठाण्यांतर्गत कामठी (अंतरगाव) येथील दारूविक्रेत्याने महिला मंडळाच्या अध्यक्ष व त्यांच्या मुलावर हल्ला चढविला. त्या घटनेचा निषेध व महिला दारूबंदी मंडळाला संरक्षण मिळावे या मागणीकरिता महिला मंडळाच्या अध्यक्ष पुष्पा झाडे यांच्या नेतृत्वात सेलूचे तहसीलदार रवींद्र होळी यांना निवेदन देण्यात आले.
सेलू पोलीस ठाण्यांतर्गत बहुतेक गावांत दारूबंदी महिला मंडळ कार्यरत आहे. पोलीस प्रशासन आणि दारूबंदी महिला मंडळाच्या प्रयत्नांमुळे बहुतांश गावांतील दारू गाळणे आणि विक्री करणे बंद आहे. काही व्यवसाय सुरू असलेल्यांवर माहिती मिळताच पोलीस धाडी टाकून दारूविक्रेत्यांच्या मुसक्या आवळतात. यात आरोपींची लगेच जामिनावर सुटका होत असल्याने याचा त्रास दारूबंदीकरिता कार्य करणाऱ्या महिलांना होत आहे.
असाच प्रकार कामठी येथे घडला. महिला मंडळाच्या अध्यक्ष उर्मिला पाठक व त्यांच्या मुलाला दारूविक्रेत्याकडून संशयाच्या आधारे मारहाण करण्यात आली. यामुळे महिलांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. याबाबत त्यांनी तहसीलदारांमार्फत जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर करून यावर आळा घालण्याची मागणी केली आहे. यावेळी शेकडो महिला हजर होत्या.(तालुका प्रतिनिधी)