पावसाची दडी, शेतमजूरही चिंतेत
By Admin | Updated: July 8, 2015 02:21 IST2015-07-08T02:21:33+5:302015-07-08T02:21:33+5:30
पावसाने डोळे वटारल्यामुळे शेतपिके धोक्यात आलीच आहे. तसेच मजुरांवरही कुऱ्हाड कोसळली आहे. मजुरी नसल्यामुळे खायचे काय असा प्रश्न मजुरांना पडला आहे.

पावसाची दडी, शेतमजूरही चिंतेत
कामासाठी भटकंती : सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा
आकोली : पावसाने डोळे वटारल्यामुळे शेतपिके धोक्यात आलीच आहे. तसेच मजुरांवरही कुऱ्हाड कोसळली आहे. मजुरी नसल्यामुळे खायचे काय असा प्रश्न मजुरांना पडला आहे. तसेच मुलांच्या शाळा सुरू झाल्याने त्यांचा खर्च कस करावा हा प्रश्नही त्यांंना सतावत आहे.
मृग नक्षत्रात दमदार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे बळीराजासह शेतमजुरांच्या आशा पल्लवीत झाल्या. रोवणी व पेरणीमुळे मजुरांच्या हाताला काम मिळाले. दिले. सर्वत्र शेतशिवारांमध्ये कामांची लगबग सुरू असल्याने सर्वत्र शेतांमध्ये काम करणारे मजूर दिसत होते. पण पेरण्या आटोपताच पावसाने दडी मारली. आज बरसेल, उद्या येईल ही आस लावून शेतकरी व शेतमजूर आकाशाकडे डोळे लावून बसले आहे. पण पधरवड्यापासून ढगातून टिपूसभर थेंब ही जमिनीवर पडला नाही. चार-पाच दिवसांपासून ढग नुसतेच वाकुल्या दाखवित आहे.
पाऊस नसल्यामुळे रिकामपण म्हणून शेतकऱ्यांनी पिकाला आलटुन-पालटुन डवरणी केली. त्यामुळे शेतात तण वाढले नाही. निंदण व खुरपणाची कामे थांबली. पाऊसच नाही तर रासायनिक खत तरी कसे देणार. त्यामुळे मजूरवर्गाला कामच नाही. मजुरी नसल्यामुळे हातात पैसा नाही. अन्न-धान्य घरात असले तरी तिखट, मीठ, तेल, भाजी कसे विकत घेणार हा मोठाच प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. बळीराजा तर मोठ्याच कात्रीत सापडला आहे.
पाऊस येत नाही. विहिरीतील पाण्याची पातळी खाली गेली, विजेचा खेळखंळोबा सुरू आहे. तर दुसरीकडे कोरडवाहू शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. रोपटी किती दिवस तग धरुन राहणार हा शेतकऱ्यांपुढे प्रश्न उभा ठाकला आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांसाठी ‘बुरे दिन’ आल्याचे बोलल्या जात असून मजुरांना पावसाची प्रतीक्षा आहे.(वार्ताहर)