आष्टी, आर्वी तालुक्यांत पावसाचा कहर

By Admin | Updated: January 3, 2015 01:41 IST2015-01-03T01:41:45+5:302015-01-03T01:41:45+5:30

आष्टी (शहीद) : नववर्षाच्या पूर्वसंध्येला अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह, पावसाने कहर केल्यामुळे परिसरातील शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले.

Rainfall of rains in Ashti, Arvi taluka | आष्टी, आर्वी तालुक्यांत पावसाचा कहर

आष्टी, आर्वी तालुक्यांत पावसाचा कहर

आष्टी (शहीद) : नववर्षाच्या पूर्वसंध्येला अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह, पावसाने कहर केल्यामुळे परिसरातील शेतपिकांचे प्रचंड नुकसान झाले. कापूस, तूर, संत्रा, मिरची पिकांना या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसला. आष्टी तालुक्यात तीन हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. आजही आभाळ भरून असल्यामुळे पावसाची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
गुरूवारच्या मध्यरात्री पाऊस पडायला सुरूवात झाल्यामुळे शेतात पांढराशुभ्र कापूस पाऊस व हवेच्या माऱ्यामुळे मातीत झोपला. आष्टी, साहूर, तळेगाव, लहान आर्वी या चारही सर्कलमध्ये मोठे नुकसान झाले. संत्राच्या आंबिया बहाराला झळ बसली आहे. साहूर भागात शीतलहर गेल्यामुळे दीड हजार हेक्टर वरील पिकांना आधीच नुकसानीची झळ बसली. तूर पिकांचे हवेच्या माऱ्यामुळे नुकसान झाले आहे. मजुरांची कमतरता आणि भाव वाढल्याने वेचणीसाठी वेळ होतो. शेतकरी कुटुंबासह दिवसभर होईल तेवढी वेचणी करीत होते. त्यातच पावसाची हजेरी लागल्याने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. मिरची पिकावर आधीच रोगाने ग्रासले आहे. त्यातच पावसामुळे आणखी नुकसान झाले आहे. तूर पिकांना पाणी पोषक असले तरी हवेच्या माऱ्यामुळे तुरी जमिनीवर झोपल्या आहे. परंतु गहू, हरभरा, तूर या पिकांसाठी पाऊस पोषक असल्याची माहिती कृशी विभागाने दिली.
तालुक्यातील काही गावात घरावरील टिनपत्रे उडाली आहे. जनावरांचे गोठे हवेच्या तीव्रतेने पडले आहे. सकाळपासून जोरदार थंडी व पाऊस या दोन्हीमुळे जनजीवन प्रभावित झाले होते. भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांसाठी वारंवार कर्दनकाळ ठरत आहे. दरवर्षी संकटांचा सामना करावा लागत आहे. पावसाच्या व शीतलहरीच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी विजय मेंढजोगे यांच्यासह सर्व कृषी सहायकांनी तयारी दर्शविली आहे. नुकसान झालेल्या पिकाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार असल्याची माहिती तालुका कृृषी अधिकारी मेंढजोगे यांनी दिली. सद्यस्थितीत तालुक्यात तीन हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. नुकसानीची किंमत लाखांच्या घरात आहे. दरम्यान शुक्रवारीही वातावरण ढगाळलेलेच होते. दिवसभर पावसाने हजेरी लावली नव्हती तरी रात्री बसरणार अशी शक्यता वर्तविली जात होती. थंडीमुळे नागरिक घराबाहेर पडायचा कंटाळा करीत होते. त्यामुळे सगळीकडे शुकशुकाट होता. शेतकरी वर्गात मात्र चिंता पसरली आहे.(प्रतिनिधी)
आर्वी - दोन दिवसांपासून आर्वीसह तालुक्यात वादळी पावसाने थैमान घातल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात अतिथंडीमुळे धुक्याची दाट छाया रात्री व सकाळी पहावयास मिळत आहे. यातच कडाक्याच्या थंडीमुळे या अवकाळी पावसाचा विपरित परिणाम दिसून येत आहे.
आर्वी परिसरात ढगाळी वातावरण होते. गुरुवारी दिवसभर तसेच रात्रीही पावसाची रिपरिप सुरूच होती. या अवकाळी पावसामुळे गुरुवारी परिवहन मंडळाच्या बसेसचे वेळापत्रक पार कोलमडले तर शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, विद्यार्थी व शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती तुरळक दिसून आली.
दोन दिवसांपासून आर्वी तालुक्यात वादळी पाऊस व धुक्याची दाट छाया दिसून येत आहे. या वातावरणामुळे आजर बळावण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कपाशी, तूर, चना पिकाला या पिकांना या पावसाचा जबर फटका बसण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहे.
वीटभट्टी मालकांचे नुकसान
जिल्ह्यात अचानक आलेल्या पावसाने वीटभट्टीचालकांची दाणादाण उडाली. हजारो विटा ओल्या झाल्या. तसेच लावलेल्या भट्ट्याांमध्ये पाणी गेल्याने आणखी नुकसान झाले आहे.
सध्या बांधकामांना मोठ्या प्रमाणात सुरुवात झाल्याने विटांची मागणी वाढली आहे. दररोज विटांची मागणी होत आहे. परंतु अचानक आलेल्या पावसाने भाजल्या नसलेल्या विटांची पुन्हा माती केली आहे. त्यामुळे वीटभट्टीचालकांचे मोठे नुकसान झाले आहे.
सिमेंटच्या विटांची मागणी जिल्ह्यात काही प्रमाणात असली तरी त्या महाग असल्याने मातीच्या विटांचीच मागणी जास्त आहे. शासनाने नुकसान भरपाई देण्याची मागणी वीटभट्टीचालक करीत आहे.
नवीन वर्षात सूर्यदर्शनच झाले नाही
नववर्षाच्या प्रारंभीच दोन दिवसांपासून ढगाळ व पावसाळी वातावरणामुळे सूर्यदर्शन झालेच नाही. सर्वत्र पावसाळी वातावरण बिर्माण झाले आहे. या वातावरणातील झपाट्याने होणारा बदल हा सामान्य नागरिक व शेतकरी यांच्यासाठी मात्र धोक्याचा ठरणार का अशी शक्यता व्यक्त होत आहे.
नवीन वर्षाचा पहिला दिवस सर्र्वांना सततच्या पावसामुळे घरी राहूनच साजरा करावा लागला. गुरूवार हा आर्वी तालुक्यासाठी बाजाराचा दिवस असतो. पावसामुळे वर्षाच्या पहिल्याच गुरूवारी बाजारात तालुक्यातील गावकरी व नागरिकांची तुरळक गर्दी दिसून आली. याचा फटका भाजी विक्रेत्यांना बसला तर अनेकांना पावसामुळे आपला माल बाजारात विक्रीला आणता आला नाही. जिनिंग प्रेसिंगमध्ये खासगी कापसाच्या गंजीला या पावसाचा फटका बसला. सध्या कपाशी पिकाचा वेचणीचा हंगाम सुरू आहे. या पावसामुळे कापूस ओला होऊन त्याची प्रती खराब होते. त्यामुळे आर्वीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत मालाची आवक मंदावली आहे.
संत्रा उत्पादक संकटात
आष्टी (श.)- वादळी वारा व अकस्मात पाऊस १ जानेवारीच्या झालेल्या पावसामुळे संत्रा उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. यावर्षी अंबिया बहराचा संत्रा भरपूर प्रमाणात आहे. दरवर्षी डिसेंबरच्या अखेरीस संत्र्यास दरहजारी दोन हजार रूपये भाव असतो. परंतु यावर्षी ९०० ते एक हजार रू. भाव असल्याने संत्रा उत्पादक बागाईतदारांनी संत्रा विकणे रोखले आहे. अशातच आता वादळी पाऊस झाल्याने संत्रा उत्पादक संकटात सापडले आहेत. विशेष म्हणजे २० ते २५ रू किलो भाव असणारा संत्रा यावर्षी ८ ते १० रू. किलो प्रमाणे विकल्या जात आहे. परिणामी शेतकरी वर्ग आर्थिक विवंचनेत आहे. शासनाने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना त्वरीत मदत करावी अशी मागणी संकटग्रस्त संत्रा उत्पादक करीत आहे.
अवकाळी पाऊस शेतीला कुठे तारक तर कुठे मारक
केझळर - गुरुवारी झालेला अवकाळी पाऊस शेतीकरिता कुठे तारक तर कुठे मारक ठरणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये क ही खुशी कही गम अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. कोरडवाहू शेतीकरिता गुरुवारचा पाऊस हा संजीवनी ठरणारा असला तरी ढगाळ वातावरण तूर आणि हरभरा पिकांकरिता नुकसानकारक आहे. दुसरीकडे ओलिताच्या शेतीला हा अवकाळी पाऊस सपशेल मारक ठरत आहे. परिसरातील कपाशी, तूर आणि हरभरा या पिकांचे नुकसान झालेले आहे. सध्या शेतीतील कपाशी वेचणीचे काम सुरू आहे. परंतु गुरुवारच्या पावसामुळे शेतातील कापूस ओला होऊन जमिनीवर गळाला. त्यामुळे एकरी एक ते दोन क्विंटलचे नुकसान होईल असा अंदाज व्यक्त होत आहे.

 

Web Title: Rainfall of rains in Ashti, Arvi taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.