पावसाचा कहर; पिकांची राखरांगोळी
By Admin | Updated: March 2, 2015 00:16 IST2015-03-02T00:16:57+5:302015-03-02T00:16:57+5:30
शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात पिकांची राखरांगोळी केली आहे़ वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची आर्वी तालुक्यात नोंद झाली...

पावसाचा कहर; पिकांची राखरांगोळी
वर्धा : शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण जिल्ह्यात पिकांची राखरांगोळी केली आहे़ वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची आर्वी तालुक्यात नोंद झाली असून गहू, चणा, तूर पिकांची धुळधाण झाली आहे़ अनेक शेतकऱ्यांनी तूर अद्याप काढली नव्हती़ पेट्या बांधून ठेवण्यात आलेल्या होत्या; पण कालपासून संततधार सुरू असलेल्या पावसामुळे त्या पेट्या शेतातच सडण्याची भीती व्यक्त होत आहे़ शिवाय वादळी पावसामुळे अनेकांच्या घरावरील छतही कोसळले़ तब्बल १२ तासांपर्यंत सुरू असलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी व ग्रामीण नागरिकांचे मोठेच नुकसान झाले़(लोकमत न्यूज नेटवर्क)
१२ तास संततधार
तळेगाव (श्या.पं.) - शनिवारी दुपारी ४ वाजतपासून परिसरात वादळी वाऱ्यासह पावसास सुरूवात झाली़ कमी-अधिक १२ तास पाऊस झाल्याने शेतात लावलेल्या तुरीच्या वचन्याच्या गंज्या वादळामुळे उडाल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. गव्हाचे उभे असलेले पीक शेतामध्ये जमिनीवर लोळले़ मृगबहाराची संत्री गळाली. शेतकऱ्यांचे रोख रकमेचे पीक असणाऱ्या संत्र्याच्या मृग बहाराची संत्री वादळामुळे खाली आली. यामुळे शेतकरी पूर्णत: हतबल झाला आहे.
या परिसरातील गहू पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे. हरभरा सवंगणीवर आला असताना अचानक हजेरी लावलेल्या वादळी पावसामुळे हरभरा पूर्णत: भिजला आहे. पावसामुळे शेतात सवंगलेली तूर, हरभरा आणि गव्हाच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
यामुळे शेतकऱ्यांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले आहे. महसूल व कृषी विभागाने सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
शेतकऱ्यांच्या मागील संकटांची मालिका सुरूच
कापसाला भाव नाही तर दोन आठवड्यानंतर पुन्हा वादळवाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे़ सर्वाधिक नुकसान गहू आणि संत्रा पिकाचे झाले आहे़ परिसरात सर्वत्र ऊंबईवर आलेला गहू शेतातच झोपला आहे़ यापूर्वीच्या वादळाने गव्हाचे दाने बारिक झाले होते़ रविवार सकाळपासून पाऊस सुरू असल्याने पावसाळ्याची झड असल्यागत दृश्य आहे़