भोसा ते सिंदी (रेल्वे) रस्त्याचे डांबरीकरण करा
By Admin | Updated: October 19, 2016 01:25 IST2016-10-19T01:25:38+5:302016-10-19T01:25:38+5:30
भोसा ते सिंदी (रेल्वे) या साडे पाच किमी रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. याबाबत आ. समीर कुणावार,

भोसा ते सिंदी (रेल्वे) रस्त्याचे डांबरीकरण करा
ग्रामस्थांची मागणी : रस्त्याच्या दुरवस्थेमुळे विद्यार्थ्यांचे होतेय शैक्षणिक नुकसान
वर्धा : भोसा ते सिंदी (रेल्वे) या साडे पाच किमी रस्त्याची अत्यंत दयनिय अवस्था झाली आहे. याबाबत आ. समीर कुणावार, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन ४० दिवस लोटले; पण अद्याप कार्यवाही करण्यात आली नाही. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
याबाबत आ. कुणावार यांना विनंती केल्यानंतर ०.५ किमी अंतरातील खड्डे बुजविण्यात आले. सद्या ५ किमी रस्त्यावर खड्ड्यांचे मालिका तयार झाली आहे. परिणामी, विद्यार्थी, नागरिक, मजूर तसेच ग्रामस्थांना त्रास सहन करावा लागत आहे. या खड्डेमय मार्गाने दुचाकी, सायकल चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. यामुळे विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागतो. हातात सायकल घेऊन चालणेही कठीण झाले आहे.
सिंदी येथे बाजारपेठ, विद्यालय, महाविद्यालय, नगर परिषद, तहसील आदी कामांसाठी नागरिकांना जावे लागते. शिवाय मजूर तथा वर्धा-नागपूर ये-जा करण्याकरिता रेल्वेसाठी सिंदी येथे जावे लागते. रस्ता खराब झाल्याने त्यांनाही त्रास सहन करावा लागतो. भोसा हे गाव आ. कुणावार यांनी आदर्श गाव म्हणून निवडले आहे. आदर्श गावातील रस्त्याची स्थिती अशी असेल, तर इतर गावांचे काय, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहे. लोकप्रतिनिधी व संबंधित विभागाने लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)