आर्थिक हतबलतेत रबीच्या पेरण्या
By Admin | Updated: November 30, 2014 23:09 IST2014-11-30T23:09:45+5:302014-11-30T23:09:45+5:30
खरीप हंगामात सातत्याने तीन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पदरी दुष्काळच येत आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा त्याला सामना करावा लागत आहे. यंदाच्या खरीपात हतबल झालेला बळीराजा

आर्थिक हतबलतेत रबीच्या पेरण्या
बियाणेही महाग : नापिकीचे संकट कायमच
घोराड : खरीप हंगामात सातत्याने तीन वर्षांपासून शेतकऱ्यांच्या पदरी दुष्काळच येत आहे. कधी ओला तर कधी कोरड्या दुष्काळाचा त्याला सामना करावा लागत आहे. यंदाच्या खरीपात हतबल झालेला बळीराजा कशीबशी आर्थिक जुळवाजुळव करून रबीच्या पेरणीत व्यस्त होतानाचे चित्र दिसू लागले आहे. आर्थिक दृष्ट्या हतबल झालेला शेतकरी रबीच्या पिकापासून आशा लावून आहे.
‘झाले गेले विसरूणी जावे, पुढे पुढे चालावे’ या उक्तीप्रमाणे बळीराजा उराशी असलेले आर्थिक दु:ख दूर सारत आशेचा किरण उगवेलच म्हणून गहू व चणा पेरणीच्या कामात व्यस्त झाल्याचे दिसून येत आहे. गहू पेरणीसाठी लागणारे बियाणे ५० रुपये किलोच्या दरात विकत घ्यावे लागत असून एका एकराला ४० किलो बियाणे लागते आहे. बियाण्याकरिता दोन हजाराचा खर्च, पेरणीसाठी एक हजार व ओलिताचा येणारा खर्च त्याला सोसावा लागत आहे. यातही थंडीचा पत्ता नसल्याने रबीवरही संकट येण्याचे चिन्ह आहे.
रासायनिक खताचे भाव गगणाला भिडत आहेत. अशात पैशाची जुळवाजुळव करणे शक्य नसल्याने बहुतांश शेतकरी पेरणीच्या वेळी रासायनिक खताचा वापर करताना दिसत नाही़ गव्हाचे उत्पन्न हाती येण्यास मार्च-एप्रिल महिना येणार आहे़ ओलिताच्या वेळी युरीयाची मात्रा द्यावी असे शेतकऱ्यांनी ठरविले असून घरी असलेला कापूस विकूण हा खर्च करावा लागणार आहे़ यातही कापूस विकून उधारीचा पैसा द्यावा वा रबीच्या पेरणीचा खर्च करावा अशा विवंचनेत तो आहे. कापसाच्या उत्पन्नात घट झाली आहे़ त्यातही तो विक्रीस काढल्यास योग्य दर मिळण्याची शाश्वती नाही. यामुळे चिंता कामय आहे. सोयाबीन तर कसे उगविले कसे गेले हे कळलेच नाही. अशातच विजेचे बील, घरखर्च, मुलांचे शिक्षण आदी खर्च कसा करावा या विवंचनेतही बळीराजा आहे. शेती पडीक कशी ठेवणार वडिलोपार्जीत सुरू असलेल्या व्यवसायाला खिळ बसेल असे अनेक प्रश्न मनात घेवून पुन्हा बळीराजा कामाला लागला आहे.(वार्ताहर)