एक लाख हेक्टरवर रबीची पेरणी
By Admin | Updated: October 28, 2014 23:00 IST2014-10-28T23:00:38+5:302014-10-28T23:00:38+5:30
खरिपात पावसाच्या दडीने हतबल झालेला शेतकरी रबीतून झालेले नुकसान भरून काढणार असे भाकीत करून कृषी विभागाच्यावतीने रबी हंगामाचा आराखडा तयार करण्यात आला. यात सुमारे

एक लाख हेक्टरवर रबीची पेरणी
कृषी विभागाचे नियोजन : गत हंगामात ७५ हजार ४४१ हेक्टरवर झाला होता पेरा
वर्धा : खरिपात पावसाच्या दडीने हतबल झालेला शेतकरी रबीतून झालेले नुकसान भरून काढणार असे भाकीत करून कृषी विभागाच्यावतीने रबी हंगामाचा आराखडा तयार करण्यात आला. यात सुमारे १ लाख ८ हजार ५०० हेक्टरवर पेरा होईल असे भाकीत नियोजनातून वर्तविण्यात आले आहे. कृषी विभागाचा आराखडा तयार झाला असला तरी शेतकऱ्यांची पेरणी करण्याची तयारी झाली नसल्याचे जिल्ह्यात वास्तव आहे.
साधारणत: दिवाळी झाली की रबीच्या पेरणीला प्रारंभ होतो; मात्र सध्या जिल्ह्यात तसे चित्र नाही. शेतात खरीपाचे पीक अद्याप कायम आहे. त्याची सवंगणी झाली नाही. या पिकाची कापणी करून शेतात मशागत करून रबीची पेरणी करण्यात येते. सध्या तसे चित्र नाही. रबी हंगामाकरिता कृषी विभागाचा आराखडा तयार झाला असला तरी शेतकऱ्याचे नियोजन मात्र अद्याप तयार झाले नाही. यंदाच्या हंगामात गत वर्षीच्या तुलनेत पेरा वाढणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. गत हंगामात ७५ हजार ४४१ हेक्टरवर रबीचा पेरा झाला होता.
गत आठवड्यात आलेल्या पावसामुळे हरभऱ्याचा पेरा वाढणार असल्याचा उल्लेख आराखड्यात करण्यात आला आहे. यंदाच्या हंगामात ६९ हजार ५०० हेक्टरवर हरभरा पेरण्यात येईल असा अंदाज कृषी विभागाच्या आराखड्यात तयार करण्यात आला आहे. गत वर्षी जिल्ह्यात ४० हजार ३३ हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला होता. केवळ हरभराच नाही तर गहू , रबी ज्वारी व इतर पिकांच्या पेरण्यातही वाढ होणार असल्याचे कृषी विभागाच्या आराखड्यात नमूद आहे. यंदा ३३ हजार हेक्टरवर गव्हाचा पेरा होणार असल्याचे आराखड्यात नमूद आहे. तर गत हंगामात २४ हजार ७५२ हेक्टरवर गव्हाचा पेरा झाला होता. २ हजार ५०० हेक्टरवर रबी ज्वारी होणार असून गत वर्षी ११ हजार ७८ हेक्टरवर पेरा झाला होता. इतर पिके १ हजार हेक्टरवर पेरण्यात येणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)