आदर्श नगरवासीयांचा पाणी प्रश्न सुटणार
By Admin | Updated: April 28, 2016 01:55 IST2016-04-28T01:55:22+5:302016-04-28T01:55:22+5:30
पाण्यासाठी हाल सहन करणाऱ्या आदर्शनगरवासीयांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

आदर्श नगरवासीयांचा पाणी प्रश्न सुटणार
सेवाग्राम : पाण्यासाठी हाल सहन करणाऱ्या आदर्शनगरवासीयांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे पाणी मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे. थकीत देयकामधील काही रक्कम भरल्याने ही अडचण तात्पुरती दूर झाली आहे.
गत काही वर्षापासून आदर्शनगर वासीयांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यंदा मार्च महिन्यापासूनच पाणीटंचाईच्या झळा पोहोचायला सुरूवात झाली. परिणामी जनक्षोम वाढला. येथील पाणीटंचाई बाबत ‘लोकमत’मध्ये वृत्तही प्रकाशित झाले. यानंतर जीवन प्राधिकरण आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभागाशी सरपंच, उपसरपंच, सचिव आणि सदस्यांनी उपाययोजनेबाबत चर्चा केली. नागरिकांना उद्रेक टाळण्यासाठी ग्रा.प. प्रशासनाला जीवन प्राधिकरणशिवाय पर्याय नव्हता. पण २०१० व २०११ मध्ये उन्हाळ्यात आदर्शनगरला दिलेल्या पाण्याचे थकीत साठ हजार रुपये ग्रा.प. ला देणे असल्याने आधी पैसे नंतर पाणी अशी भूमिका प्राधिकरणने घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सोमवारला ४० हजार रूपयाचा धनादेश प्राधिकरणला दिला. उर्वरीत रक्कम पंधरा दिवसात देणार असा करारनामा केल्यावरच पाणी पुरवठा सुरू होणार आहे. वरूड (रेल्वे) ग्रा.प. हद्दीत सेवाग्राम वर्धा मार्गाजवळच ग्रामीण पाणी पुरवठा जलकुंभ आहे. येथूनच पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.(वार्ताहर)