‘त्या’ पाच गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर
By Admin | Updated: June 3, 2016 02:03 IST2016-06-03T02:03:49+5:302016-06-03T02:03:49+5:30
पुलगाव येथील दारूगोळा भांडारामध्ये चौथ्यांदा झालेल्या स्फोटामुळे हादरलेल्या परिसरातील त्या पाच गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.

‘त्या’ पाच गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर
सर्वेक्षण व मोजणी झाली : प्रस्ताव केंद्र शासनाकडे प्रलंबितच
पराग मगर वर्धा
पुलगाव येथील दारूगोळा भांडारामध्ये चौथ्यांदा झालेल्या स्फोटामुळे हादरलेल्या परिसरातील त्या पाच गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
दारूगोळा भांडाराच्या कक्षा रुंदावणार होत्या. यासाठी काही वर्षांपूर्वी सर्वेक्षण व जमिनीची मोजणी झाली. तत्सम आखणी करण्यात आली होती. ही सर्व प्रक्रिया होत असल्याने नाचणगाव, पिपरी (खराबे), आगरगाव, नागझरी, मुरदगाव आणि येसगाव येथील नागरिकांत लवकरच आपल्याला राहते घर सोडावे लागणार, अशी भावनाही निर्माण झाली होती; पण घोडे कुठे अडले कळलेच नाही. अद्यापही या गावांचे पुनर्वसन न झाल्याने दहशतीत जगावे लागत आहे. यामुळे पाचही गावांचे पुनर्वसन कधी होणार? असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. २८ किमीच्या विस्तीर्ण जागत असलेल्या पुलगाव दारूगोळा भांडारालगत वस्ती असू नये, असे नियम आहे. तशी दाट वस्तीही दारूगोळा भांडाराच्या आसपास नाही; पण लगतची गावे कायम आहेत. दारूगोळा भांडाराच्या सिमेपासून काही अंतरावर पिपरी (खराबे), आगरगाव, नागझरी आणि मुरदगाव ही गावे आहेत. पुलगाव दारूगोळा भांडारामध्ये नेहमी स्फोट होत असतात. पूर्वी मुदत संपलेले बॉम्ब खंदकामध्ये फोडले जात होते. यात होणाऱ्या स्फोटामुळे परिसरातील गवताला आगीही लागत होत्या. यामुळे जीविताला धोका होऊ नये म्हणून पाचही गावे रिकामी करावी लागत होती.
या गावांतील नागरिकांना देवळी येथील धर्मशाळेत आणि नाचणगाव येथील मंदिरामध्ये थांबविले जात होते. दारूगोळा भांडारातील आग नियंत्रणात आली की, पुन्हा ग्रामस्थ आपापल्या घरी परतत होते. गत कित्येक दशकांपासून हा प्रकार सुरू आहे. यावर तोडगा म्हणून पिपरी (खराबे), आगरगाव, नागझरी, मुरदगाव व येसगाव ही गावे ताब्यात घेत नागरिकांचे पुनर्वसन करावे, अशी मागणी समोर आली होती. शिवाय दारूगोळा भांडाराचे विस्तारीकरणही प्रस्तावित होते. यामुळे पाचही गावांचे पुनर्वसन होणार, अशी अपेक्षा व्यक्त होत होती. याबाबत सर्वेक्षण, मोजणीही करण्यात आली; पण आठ-दहा वर्षांचा काळ लोटला असताना अद्यापही पुनर्वसनाची प्रक्रिया पूढे सरकली नाही. पुलगाव दारूगोळा भांडाराला लागून असलेल्या पाचही गावांतील जमिनीचे अधिग्रहण करून नागरिकांना मोबदला देणे आणि पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध करून देणे, ही बाब प्रस्तावित होती; पण काळ लोटला असताना केंद्र शासनाकडून कुठलीही भूमिका घेण्यात आली नाही. यामुळे आजही गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न खितपत आहे.
आता काल-परवा झालेल्या बॉम्ब स्फोटामुळे हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. आता तर पिपरी (खराबे) या गावातील नागरिकही आमच्या जमिनी घ्या आणि गावाचे पुनर्वसन करा, अशी मागणी करू लागले आहेत. आगरगाव, नागझरी, मुरदगाव व येसगाव येथील नागरिकांनीही जमिनी अधिग्रहित करून पुनर्वसन करावे, अशी मागणी केली आहे. ग्रामस्थांच्या या मागणीचा आता तरी विचार होणार की नाही, हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे.
पुलगाव येथील दारूगोळा भांडारामध्ये सोमवारी रात्री स्फोट झाला. याचा परिसरातील गावांना जबर हादरा बसला. या स्फोटाने लागलेली आग विझली असली तरी समाजातील धग कायम आहे. शहिदांच्या कुटुंबीयांचा टाहो, मृतदेह न मिळणे, ओळख न पटणे ही एक बाजू आणि अर्ध्या रात्री जीवाच्या आकांताने ग्रामस्थांची होणारी पळापळ, ही दुसरी बाजू. दोन्ही पैलू मन अस्वस्थ करणारेच आहेत.